ठाकरे सरकार अल्पमतात, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – नारायण राणे

ठाकरे सरकार अल्पमतात, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – नारायण राणे

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 8 ते 9 आमदार फुटले आहेत. याचाच अर्थ ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. बहुमतासाठी १४५ आमदारांचे पाठबळ लागते, परंतु सध्याच्या स्थितीत ठाकरे सरकारकडे बहुमत नसल्याचे स्पष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला १० वर्षे मागे नेले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका करीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा भाजपकडून राज्यसभेवर निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करीत जल्लोष करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नारायण राणे आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे म्हणाले की, शिवसेनेला सत्तेत असूनही मित्रपक्षांची जेवढी मते मिळायला हवी होती तेवढीही मते मिळाली नाहीत. त्यांचे ८-९ आमदार फुटतात. त्यांची विश्वासार्हता कुठे आहे? आम्ही विरोधात असूनही एकसंध राहिलो. उलट आम्ही त्यांचीच मते फोडली. आमदारांची भाजपवर असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे राज्यसभेची ही निवडणूक भाजप जिंकली. राज्यात सत्तेत येण्यासाठी १४५ मतांची आवश्यकता असते, मात्र या निकालाने तुम्ही अल्पमतात गेला आहात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. 2024मध्ये तर शिवसेनेचे 20 आमदारही निवडून येणार नाहीत.

मुख्यमंत्र्यांची नाचक्की झाली

महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसाठी जी भाषा वापरली नाही त्या भाषेत उद्धव ठाकरे बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत होते. आम्ही वाघ आहोत, अमूक आहोत, असे म्हणत होते. निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे जे नेते वाघाप्रमाणे डरकाळी फोडत होते, ते प्रत्यक्षात शेळीही नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. निकालानंतर त्यांच्यावर आता नामुष्की ओढावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाचक्की आणि बेअब्रू झाली आहे. संजय राऊत काठावर पास झालेत, अशा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

First Published on: June 13, 2022 4:18 AM
Exit mobile version