नारायण राणेंना या अटी, शर्थींवर मिळाला जामीन, रायगडमध्ये लावावी लागणार हजेरी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानप्रकरणी महाड पोलिसांनी राणे यांना मंगळवारी दुपारी अटक केली. त्यानंतर रायगड दंडाधिकाऱ्यांसमोर रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या सुनावणीत राणे यांना न्यायालयाने जामिन मंजूर केला. मात्र न्यायालयाने राणे यांना जामिन मंजूर केला असला तरी येत्या ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी राणे यांना प्रत्यक्ष रायगड पोलिसांच्या क्राईम ब्रांचमध्ये हजेरी लावावी लागणार आहे. तसेच साक्षीदारांवर राणे कोणताही दबाव आणणार नाहीत अशा अटी घालत न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामिन मंजूर केला आहे. .

मंगळवारी सकाळी सात वाजल्याासून राणे यांच्या वक्तव्यावरून राज्यभरात तणावाचे वातावरण होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्यात ठिकठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या. तसेच शिवसेना आणि भाजपच्या कार्याकर्त्यंामध्ये दगडफेकीबरोबरच हाणामारीच्याही घटना घडल्या. यामुळे राज्यात दिवसभऱात तणाव होता. संगमेश्वर पोलिसांनी दुपारी २. २५ मिनिटांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतले आणि महाड पोलिसांकडे सुपुर्द केले. त्यानंतर संध्याकाळी ६ च्या सुमारास महाड पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक दाखवत रायगड न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले.

संध्याकाळी सात वाजल्यापासून महाड येथे भाजपचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक मोठ्या संख्येने जमू लागले होते. राणे यांचे संपूर्ण कुटुंब पत्नी निलिम, मुलगा, नितेश व निलेश हे देखील न्यायालयात हजर होते. तर भाजपकडून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ,आमदार प्रसाद लाड आणि सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे दिवसभर राणेंसोबत होते.

रात्री ११ वाजण्याच्या सुमारास न्यायालयाने राणे यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर काही अटी व शर्थींसह जामिन दिला. न्यायालयाीन निकाल आल्यानंतर एक तासाने १२ च्या सुमारास नारायण राणे पोलिसांच्या कडेकोट पोलीस बंदोबस्त महाड न्यायालयीन कोर्टातून बाहेर पडले. दरम्यान, नाशिक आणि पुणे पोलीस राणे यांचा ताबा घेणार नसल्याचे समजते. राज्याच्या आणि देशाच्या इतिहासात पहील्यांदाच एका केंद्रीय मंत्र्याला मुख्यमंत्र्याविरोधात बेताल आणि आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटक होते. हे पहीलेच उदाहरण आहे.

राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेला आता ब्रेक लागला असून बुधवारी ते नियोजित वेळापत्रकानुसार सिंधुदुर्गात दाखल होणार होते. मात्र एक ते दोन दिवस ही यात्रा स्थगित करण्यात आल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांना दिली. सकाळी सात वाजता नाशिक पोलिसांकडून सुरू झालेली कारवाई रात्री १२ वाजता झाली. नारायण राणेंना जामिन मिळाल्यानंतर हे प्रकरण थांबले असले तरी राणेंचा स्वभाव आणि आक्रमकपण लक्षात घेता येत्या काही दिवसात शिवसेना आणि भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे.

First Published on: August 25, 2021 12:54 AM
Exit mobile version