ठाकरेंना थंडी वाजत होती की, लाज? – नारायण राणे

ठाकरेंना थंडी वाजत होती की, लाज? – नारायण राणे

उद्धव ठाकरे-राणेंमध्ये हाडवैर नाही; देसाई-परब-राऊतांना ते एकत्र आलेले नकोयत, नितेश राणेंचा आरोप

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाचा स्थगन प्रस्ताव सभागृहात फेटाळण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थंडी वाजत होती का लाज वाटत होती? असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. मी अध्यक्षांना काही बोलत नाही. मात्र सत्ताधाऱ्यांना विचारतो कायद्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर मोठे नाहीत का? सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव का नाही घेतला? असा घणाघात प्रश्न भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. सिंधुदुर्ग येथील पत्रकार परिषदेत बोलताना राज्य सरकारवर सडकून टिका केली आहे.

सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव मंजूर झाला तर सोनिया गांधींना वाईट वाटेल?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांचा गौरव प्रस्ताव भाजपकडून मांडण्यात आला होता. मात्र विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांनी नियमांचा दाखला देत हा प्रस्ताव फेटाळला. राणे म्हणाले, “सावरकर यांचा गौरव प्रस्ताव मंजूर करण्यात कोणतीच अडचण नव्हती. पण सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव मंजूर झाला तर सोनिया गांधींना वाईट वाटेल, काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यास सरकार कोसळेल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरी जावे लागेल या चितेंमुळे ठाकरे यांनी हा प्रस्ताव आणला नाही. सावरकर यांनी २७ वर्षे देशासाठी भोगला, अत्याचार सहन केले. मात्र गौरवपर अभिवादनाचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला ही गोष्ट दुख:दायक आहे.”

मच्छिमारांची उपासमार आम्ही सहन करणार नाही

“राज्य सरकार मच्छिमारांना नुकसान भरपाई देणार होते ती दिली का? मच्छिमारांची उपासमार आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे भाजप आंदोलन करणार”, असा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला. अशी अनेक उदाहरणे आहेत की, ‘नियमात नसतानाही अशा गौरव प्रस्तावांवर चर्चा झालेली आहे. देशासाठी त्याग करणाऱ्या सावरकर यांच्याबद्दल मात्र सभागृहात चर्चा होत नाही. विधानसभा अध्यक्ष हा विषय नियमात नाही असे सांगतात हे पूर्णत: चुकीचे आहे. सावरकर यांचा गौरव प्रस्ताव फेटाळणाऱ्या महाविकास आघाडीचा आम्ही निषेध करतो’, असे राणे म्हणाले.

First Published on: February 28, 2020 3:21 PM
Exit mobile version