आत्ताची शिवसेना ही स्वाभिमान नसलेली; नारायण राणेंचा प्रहार

आत्ताची शिवसेना ही स्वाभिमान नसलेली; नारायण राणेंचा प्रहार

भाजपचे खासदार नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. नारायण राणे शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. आत्ताची शिवसेना ही स्वाभिमानी आणि अभिमान नसलेली आहे, असा हल्लाबोल राणेंनी शिवसेनेवर केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला.

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला. शिवसेनेवर टीका करताना शिवसेना आणि हिंदुत्वाचा काही संबंध नसल्याचं म्हटलं. स्वाभिमान आणि अभिमान नसलेली आताची शिवसेना आहे. साहेबांच्या वेळेला वेगळी शिवसेना होती, असं नारायण राणे म्हणाले. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाहीत. उद्धव ठाकरे हे मातोश्रीचे मुख्यमंत्री आहेत, असा टोला राणेंनी लगावला. महाराष्ट्र सरकारची तिजोरी खाली आहे. सातबाऱ्याचं काय झालं, असा सवालही नारायण राणेंनी यावेळी उपस्थित केला.

शिवसेनेच्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. सुशांतच्या केसचं काय झालं? दिशा सालियानच्या केसमध्ये काय झालं? ती पण हत्या होती. पण आत्महत्या सांगण्यात आली. आता पूजा प्रकरणात देखील तेच होत आहे, असं नारायण राणे म्हणाले.

नवाब मलिकांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडणार नाहीत

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि खासदार नारायण राणे हे जोडीने मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत असल्याची खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. राज्यात स्वप्न पाहणारी मंडळी वाढत चालली आहेत. गेल्या २२ वर्षांपासून नारायण राणे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत आहेत. त्यांना आता जोडीदार म्हणून देवेंद्र फडणवीस भेटलेत, असं नवाब मलिक म्हणाले होते. याला उत्तर देताना राणेंनी मलिकांना टोला लगावला. आम्ही दोघेही मुख्यमंत्री झालेलो आहोत. कुंपणच शेत खातंय. नवाब मलिकांना स्वप्न पडणार नाहीत, कारण ते त्या स्पर्धेत नाहीत, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर केली.

 

 

First Published on: February 16, 2021 8:48 PM
Exit mobile version