मोदी म्हणाले पाटलांना; ‘दादा, बिटिया गिरनी चाहिए’

मोदी म्हणाले पाटलांना; ‘दादा, बिटिया गिरनी चाहिए’

चंद्रकांत पाटलांना रात्री सव्वादोन वाजता म्हणाले मोदी

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सातार्‍यातील वाईच्या सभेत, दिल्लीतील भाजप कार्यालयातील बैठकीतील एक किस्सा सांगितला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील या बैठकीला उपस्थित होते. याबैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. चंद्रकांत पाटील रात्री सव्वा दोनला एका मिटिंगमधून बाहेर पडत होते. त्यावेळचा किस्सा त्यांनी या सभेत सांगितला.

हा किस्सा सांगताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘बैठकीतून बाहेर पडताना, मला मोदींना हाक दिली, दादा इधर आओ’, माझे आणि मोदींचे फार जवळचे संबंध आहेत. माझ्याकडे १३ वर्ष गुजरात होते. आम्ही एकत्र काम केले आहे, हे अनेकांना माहित आहे. मोदी मला म्हणाले, ‘दादा इधर आओ… देवेन (देवेंद्र फडणवीस) को बुलाओ’ मोदी जवळ आले आणि म्हणाले, ‘दादा बिटीया गिरनी चाहिए…!’ त्यावर आम्ही दोन्ही जणांनी हा करेंगे करेंगे असे उत्तर दिले.

‘बिटीया गिरनी चाहिए’ म्हणजे काय? तर शरद पवारांची मुलगी पडली पाहिजे, हे रात्री सव्वादोन वाजता मोदींनी बैठकी बाहेर पडताना आपल्याला म्हटल्याचे चंद्रकांत पाटील यांनी वाईच्या सभेत बोलताना सांगितले.

बाळासाहेबांची ‘मुलगी’ आण ‘कमळी’

ज्या सुप्रिया सुळे राज्यसभेत बिनविरोध निवडून आल्या. त्या बिटियाविरोधात पहिल्यांदाच एवढी उघड भूमिका भाजपने घेतल्याचे समोर आले आहे. कारण पुण्यात राज ठाकरे यांनी शरद पवारांची जी मुलाखत घेतली होती, त्यात शरद पवार म्हणाले होते, ‘सुप्रियाला राज्यसभेची उमेदवारी द्यायची ठरले तेव्हा बाळासाहेबांनी मला फोन केला. मी त्यांची भूमिका विचारली.’ बाळासाहेब म्हणाले, “आमची मुलगी निवडणूक लढविणार असताना माझी वेगळी भूमिका काय असेल.” मी त्यावेळी त्यांच्या मित्रपक्षाच्या भूमिकेबद्दल विचारले. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही कमळीची काळजी करु नका. सुप्रिया बिनविरोध निवडून आली, असे शरद पवार यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र आता परिस्थिती बदलली असून त्या ‘बिटिया’चा पराभव करण्यासाठी आता दिल्लीतून बजावले जात आहे.

First Published on: April 17, 2019 9:36 AM
Exit mobile version