राज्यात नाशिकचा मृत्यूदर सर्वात कमी

राज्यात नाशिकचा मृत्यूदर सर्वात कमी

जिल्ह्यातील कोविड रूग्णांची संख्या ही ३ हजार ने कमी झाली असून मृत्यदर राज्यात सर्वात कमी म्हणजे १.६ इतका आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे मापदंड एकास १० असताना तो नाशिक जिल्ह्याचा एकास ३० इतका आहे. स्वॅब तपासणीतही नाशिकची कामगिरी अत्यंत वेगवान असून औषधे, इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारी व महापालिकेच्या रूग्णालयांमध्येच त्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिली.

कोरोनाच्या एकूणच परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे जिल्हयाचा आढावा घेतला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही केवळ मोहिम नसून या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आरोग्य साक्षर करण्याचा शासनाचा मानस असून आपल्या कुटुंब,गांव, शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या मोहिमेतून आपल्याला राज्याचा, जिल्ह्यांचा हेल्थ मॅप तयार करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हयाचा आढावा देतांना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, सध्या जिल्ह्यात २४ ते २८ मे.टन इतका ऑक्सिजन गरजेचा असून नाशिक जिल्ह्यातील मात्र स्थानिक उद्योगांच्या सहकार्यातून त्याची दररोज ५५ मे. टन इतकी निर्मिती केली जात आहे, त्यामुळे आजच्या स्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा नाही, तो पुरेसा उपलब्ध आहे, नाशिक महानगर पालिकेच्या हद्दीत पुरेसे बेड रुग्णांसाठी आज उपलब्ध असून भविष्यात बेड कमी पडणार नाही त्यासाठीही नियोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन सेंटरची निर्मिती करण्यात येत असून २५ ते ३० ऑक्सिजन बेड प्रत्येक तालुकास्तरावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काही लोक गृहविलगीकरणातही बाहेर फिरताना दिसून येत आहेत, त्यामुळे येणारी आपत्ती व लॉकडाउन टाळायचे असेल तर आपल्याला कोरोना प्रतिबंधात्मक जीवनशैली अंगवळणी पाडून त्या जीवनशैलीच्या अंगिकार करावा लागेल असेही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

First Published on: September 26, 2020 8:55 PM
Exit mobile version