गुड न्यूज: नाशिक ऑरेंज झोनमध्ये; उद्योग होतील सुरु

गुड न्यूज: नाशिक ऑरेंज झोनमध्ये; उद्योग होतील सुरु

नाशिककरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. करोना बाधितांची आकडेवारी लक्षात घेता मालेगाव आणि नाशिक असे वेगवेगळे दोन झोन शासनाने निश्चित केले असून त्यात नाशिकला ऑरेंज झोनमध्ये तर मालेगावला रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. त्यामुळे मालेगावमधील उद्योग सध्या सुरु होऊ शकणार नसले तरी नाशिकमधील उद्योग सुरु होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. परिणामी जिल्ह्यावरील मोठे आर्थिक संकट दूर होऊ शकणार आहे. शिवाय तरुणांवरील बेरोजगारीची टांगती तलवारही नाहिशी होऊ शकणार आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या पदाधिकार्‍यांनी केंद्रिय लघु-मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सवर चर्चा करुन मालेगाव वगळता उर्वरित नाशिकचा वेगळा झोन करण्याची मागणी केली होती.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. यादरम्यान निमा व एकूणच उद्योगजगताने शासनातर्फे जारी निर्देशांचे पालन करत उद्योग बंद ठेवले. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा लॉकडाऊन ३० एप्रिल पर्यंत वाढविल्याचे जाहीर केले आहे. शासनातर्फे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनुसार रेड, ऑरेंज व ग्रीन झोन्स तयार करण्यात आले आहेत. यात जिल्हानिहाय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेण्यात आली आहे. सध्या मालेगावात बाधितांची संख्या ४३ इतकी आहे. तर नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील बाधितांची संख्या अवघी पाच आहे. नाशिक आणि मालेगाव हे भौगोलिक दृष्ठ्याही मोठे अंतर असलेले शहरे आहेत. त्यामुळे मालेगावमुळे उर्वरित जिल्ह्यावर अन्याय व्हायला नको म्हणून निमाने नितीन गडकरी यांच्याशी काही दिवसांपूर्वीच व्हिडिओ कॉन्फरन्सवर चर्चा केली होती. यात सांगण्यात आले होते की, झोनचे नियोजन करत असतांना जिल्हानिहाय रुग्णसंख्या हा वर्गवारीचा निकष न ठेवता रुग्णांची मोठी संख्या असलेले ’हॉटस्पॉट’ निश्चित करून त्यांचा वेगळा झोन असावा. जसे- नाशिक जिल्ह्यात केवळ मालेगाव तालुक्यात आताच्या आकडेवारीनुसार २५ पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. नाशिक शहरात रुग्णसंख्या ३ च्या आसपास आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये न करता मालेगाव तालुका ’हॉटस्पॉट’ म्हणून जाहीर व्हावा. शहरात तसेच उर्वरित भागातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात यावेत. राज्यातील अशा भागांत योग्य ती खबरदारी घेऊन उद्योग सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी जेणेकरून व्यावसायिक चक्रे गतिमान राहतील व उद्योजक तसेच कामगाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बर्‍याच अंशी सुटेल. सदर कारखान्यांमध्ये उत्पादनप्रक्रिया सुरु असतांना सोशल डिस्टन्सिंग, जनजागृती व आरोग्यासंबंधातील खबरदारीच्या उपायांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. जिल्ह्याला सरळसोट रेड झोन म्हणून जाहीर न करता मालेगाव तालुक्याला हॉटस्पॉट म्हणून निश्चित करावे. मालेगाव वगळता नाशिक जिल्ह्यात अवघे पाचच रुग्ण आढळून आल्याने नाशिक शहरात तसेच उर्वरित भागातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याची मागणी निमाच्या वतीने अध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी व नितीन वागस्कर, मानद सचिव सुधाकर देशमुख व किरण पाटील, खजिनदार कैलास आहेर, नाशिक ग्रोथ कमिटीचे प्रमुख प्रदीप पेशकार यांनी केली होती. या पदाधिकार्‍यांची भूमिका व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जाणून घेत त्यांची अमलबजावणी करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि. १७) सकाळी महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेल्या झोननिहाय नकाशात मालेगाव आणि नाशिकचे वेगवेगळे झोन दर्शविण्यात आले. त्यात मालेगावला रेड झोन तर नाशिकला ऑरेंज झोनमध्ये टाकण्यात आले आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळून उद्योग सुरु होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आढावा घेऊन निर्णय जाहिर करतील. तोपर्यंत कुणालाही विनापरवानगी उद्योग सुरु करता येणार नाही.

या उद्योगांना मिळणार दिलासा :

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार २० एप्रिल नंतर एसईझेड क्षेत्रातील उद्योग, जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग ज्यात औषध निर्माण, वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या, ग्रामीण भागातील उद्योग, आयटी हार्डवेअर उत्पादन उद्योग, प्रॉडक्शन युनिट्स, ज्यूट उत्पादन उद्योग, पॅकेजिंग मटेरीअलचे उत्पादन करणारे उद्योग, ग्रामीण भागातील फूड प्रोसेससिंग उद्योग, कोळसा व गॅस उत्पादन व संबंधित उद्योगांना सोशल डिस्टन्सिंग, विविध अटी शर्ती व खबरदारीसह उत्पादन सुरू करता येणार आहे.

 

 

First Published on: April 17, 2020 12:15 PM
Exit mobile version