मुलगी झाल्याचा आनंद दूर ; पित्याने केली वडील, भावासह आत्महत्या

मुलगी झाल्याचा आनंद दूर ; पित्याने केली वडील, भावासह आत्महत्या

नाशिक : कर्जबाजारीपणा व खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून फळविक्रेत्यासह त्याच्या दोन तरुण मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.२९) दुपारी ३ वाजेदरम्यान घडली. सातपूरमधील राधाकृष्ण नगर परिसरात घडलेल्या या घटनेत एकाच घरातील तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तिघांनी गळफास घेतला. वडील दीपक शिरोडे (वय ५५), मुलगा प्रसाद दीपक शिरोडे (वय २५), राकेश दीपक शिरोडे (वय २३) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक शिरोडे हे अशोकनगर बसथांब्याजवळ १० वर्षांपासून फळविक्रीचा व्यवसाय करत होते. ते मूळचे देवळा तालुक्यातील उमराणे येथील आहेत. दीपक शिरोडे यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी दीपक शिरोडे, प्रदीप शिरोडे आणि राकेश शिरोडे यांनी आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून तिघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरी कुणीही नसताना ही घटना घडली. यावेळी दीपक शिरोडे यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्या घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. घराचा दरवाजा ठोठावूनही तो कोणीही उघडत नसल्याने त्यांनी नागरिकांना मदतीसाठी बोलवले. नागरिकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिघे जण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, दीपक शिरोडे यांचा लहान मुलगा राकेश शिरोडे याचे शिवाजीनगर परिसरात किराणा दुकान होते. सहा महिन्यांपूर्वी त्याने तो व्यवसाय बंद केला होता. तीन महिन्यांपूर्वी छोटाहत्ती वाहन घेत त्यानेही अशोकनगर परिसरात गाडीत फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. इंदिरानगरात १८ डिसेंबर रोजी कर्जाला कंटाळून गौरव व नेहा जगताप या पती-पत्नीने अशाच प्रकारे गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना पुढे आली होती.

मुलीच्या जन्माच्या दिवशीच पित्याची आत्महत्या

प्रसाद शिरोडेंची पत्नी गर्भवती असल्याने ती डोंबिवली येथे माहेरी गेली होती. तिने रविवारी (दि.२९) सकाळी मुलीला जन्म दिला. ही बाब समजल्याने शिरोडे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. त्यानंतर काही तासांतच मुलीच्या पित्यासह आजोबा व काकांनी आत्महत्या केली.

चिठ्ठीत लिहिले…

घटनास्थळी सापडलेली चिठ्ठी पोलिसांना ताब्यात घेतल्याचे निरीक्षक सतीश घोटेकर यांनी सांगितले. त्यात कुणाकडून किती कर्ज घेतले ते लिहून ठेवलेले आहे. याबाबत तपास सुरू आहे. दीपक शिरोडे यांच्या पश्चात सर्वांत लहान मुलगा हर्षल शिरोडे (वय १९), पत्नी प्रतिभा शिरोडे (वय ५१), मोठा मुलगा प्रसाद याची पत्नी व नवजात कन्या, तसेच दीपक शिरोडे यांची आई व भाऊ असा परिवार आहे.

कर्जवसुलीसाठी रात्री आला होता फोन

शनिवारी रात्री शिरोडे यांना कर्जवसुलीसाठी फोन आला होता. शिरोडे कुटुंबावर ७० लाखांचे कर्ज होते. त्यांनी घरही विकण्यास काढले होते, असे जवळच्या नातेवाईकांनी सांगितले. कर्जाचे ओझे व खासगी सावकारांच्या जाचातून ही घटना घडल्याची चर्चा आहे.

मंदिरातून परतताच घडले अघटित

शिरोडे कुटुंबातील मोठा मुलगा प्रसाद याचा दोन वर्षापूर्वी लॉकडाऊनमध्ये विवाह झाला होता. त्यांच्या पत्नीने डोंबिवली येथे माहेरी रविवारी सकाळी कन्यारत्नाला जन्म दिला. दरम्यान, दीपक शिरोडे यांच्या पत्नी या नेहमीप्रमाणे दुपारी दीड वाजेदरम्यान मंदिरात गेल्या होत्या. दीपक यांनी त्यांना सवयीप्रमाणे आम्ही घरी झोपतो, असे सांगून बाहेरून कुलूप लावून जाण्यास सांगितले होते. दुपारी साडेतीन वाजता त्या आपल्या सासूबरोबर घरी आल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

सुसाईड नोट मिळाली आहे त्यात कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे दिसून येते. याबाबत चौकशी करत दोषींवर कारवाई केली जाईल. खासगी सावकारांचा त्रास होत असेल तर पोलिसांकडे तक्रार करावी. : अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त

First Published on: January 30, 2023 1:18 PM
Exit mobile version