करोनामुळे कोट्यावधींच्या द्राक्षबागा धोक्यात

करोनामुळे कोट्यावधींच्या द्राक्षबागा धोक्यात

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष निर्यातदार शेतकर्‍यांच्या शेतातून माल खरेदी करत नसल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हातील द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले असून, तोडगा काढण्यासाठी त्यांनी केंद्र व राज्य सरकारला विनंती केली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यात 144 कलम लागु केला आहे. नाशिक जिल्हा निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. येथे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन घेतले जाते. अवकाळी पाऊस, थंडी तर कधी अतिउष्ण हवामानामुळे विविध रोग, किडांचा प्रादुर्भाव होतो. मात्र, उच्च तंत्रज्ञानाच्या सहाय्याने येथील शेतकरी निर्यातक्षम व दर्जेदार द्राक्ष पिक घेतात.
द्राक्ष बागायतदार आर्थिक अडचणीत असताना आता देशात करोना व्हायरसचे संकट बळीराजावर आले आहे. सर्वत्र करोनाची भीती आहे. याचे नाव पुढे करत व्यापारी, दलालानी कमी दराने द्राक्ष खरेदी सुरु केली होती. तसेच करोनामुळे परदेशात, स्थानिक बाजारपेठेत द्राक्षाचा उठाव नाही. परिणामी भाव मिळत नसल्याचे दिसते. करोनाची कारणे देत व्यापारी, दलाल द्राक्षबागायतदारांकडून खरेदी करत नाहीत. त्यामुळे हातात आलेले द्राक्ष पीक झाडांवर सोडून देण्याची वेळ आली आहे. द्राक्ष बाग शेततच सडताना बघून शेतकर्‍यांचे डोळे भरुन आले आहेत. वर्षातून एकदा येणारी द्राक्ष हातातून जाण्याची चिंता शेतकर्‍यांना वाटू लागल्याने सरकारकडे त्यांनी विनंती केली आहे.

असमानी संकटाबरोबर करोनामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहे. शेतकर्‍यांना या संकटातून वाचवण्यासाठी सरकारने मदत केली पाहिजे. अन्यथा द्राक्ष उत्पादन देशोधडीला लागतील.
-देवेंद्र काजळे, उपसरपंच (कारसूळ)
&
वर्षातून एकदाच द्राक्षपिक घेता येत असल्याने आम्ही खर्च करुन द्राक्षबागा वाचवल्या होत्या. करोनामुळे शेतावर व्यापारी येत नसल्याने या द्राक्षांचे काय करायचे? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.
-श्रीनिवास गवळी, शेतकरी (नारायण टेंभी)

First Published on: March 24, 2020 6:11 PM
Exit mobile version