अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्जास तीन महिने मुदतवाढ

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्जास तीन महिने मुदतवाढ

नाशिक : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांना तीन महिने हप्ता भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेनी घेतलेल्या निर्णयाच्या आधारे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी (दि.2) ही घोषणा केली. महामंडळातर्फे वैयक्तिक कर्ज व गट कर्ज व्याज परतावा योजनांतर्गत लाभार्थ्यांना बँकेत हप्ता भरावा लागतो. त्यानंतर महामंडळामार्फत व्याज परतावा देण्यात येतो. मात्र, सद्यस्थितीत कोरोनामुळे लाभार्थ्यांना हप्ते भरणे अशक्य आहे. याचा विचार करत केंद्र सरकार व रिझर्व बँकेच्या परिपत्रकानुसार तीन महिने हप्ते भरण्यास सवलत मिळणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी व्यवसायाकरिता राष्ट्रीयकृत बँक, खासगी बँक किंवा नॉन बँकिंग वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले आहे, त्या सर्वांना कर्जहप्ता न भरण्याची सवलत देण्यात आली आहे. तीन महिन्यांनंतर हप्ता नियमानुसार बँकेत भरल्यास नियमित व्याज परतावा देण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही, असेही मंडळाने म्हटले आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांनी सीसी कर्ज किंवा अल्प मुदत कर्ज घेतले आहे, त्यांनाही हे परिपत्रक लागू असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनी म्हटले आहे.

First Published on: April 2, 2020 5:04 PM
Exit mobile version