गिधाडांसह दुर्मिळ वनस्पतींचे होणार संवर्धन

गिधाडांसह दुर्मिळ वनस्पतींचे होणार संवर्धन

अंजनेरीचे पाच हजार ६९३ हेक्टर वनक्षेत्र हे संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून जाहीर झाले आहे. त्यामुळे आता या परिसरातील गिधाड आणि दुर्मिळ वनस्पती यांच्या संवर्धनाला बळ मिळणार आहे. आचारसंहितेनंतर या योजनांसाठी अंजनेरीला विशेष निधी प्राप्त होणार आहे. ममदापूर, बोरगडनंतर अंजनेरीचाही संवर्धन क्षेत्रात समावेश झाल्याने राज्यातील सर्वाधिक संवर्धन क्षेत्र असलेला जिल्हा म्हणून नाशिकची ओळख होणार आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी संवर्धन क्षेत्र जाहीर करण्याचा प्रस्तावावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. यासंदर्भात शासनाकडे २०१७ मध्ये प्रस्तावही पाठविण्यात आला होता. येथील दुर्मिळ वनस्पती, वन्यजीव आणि विशेषत: गिधाडांच्या संवर्धनासाठी या प्रस्तावाला महत्त्व प्राप्त झाले होते. हा प्रस्ताव मंजूर करताना अंजनेरी क्षेत्र संवर्धित झाल्याचे शासकीय आदेश वनविभागाला फेब्रुवारी अखेरीस प्राप्त झाले आहेत. त्यामुळे यापुढे या क्षेत्राच्या विकासाला अधिक गती येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे संवर्धित क्षेत्रात कुणाला सहजासहजी कुणालाही प्रवेश करता येणार नाही. येथील वनक्षेत्र संवर्धित करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची प्राधिकृत समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती संपूर्ण क्षेत्राची देखभाल करेल. तसेच पर्यावरणाचे नुकसान करणार्‍या घटकांना पायबंद घालेल.

गिधाडांचे संवर्धन का?

राज्यात गिधाडांची उल्लेखनीय संख्या ही अंजनेरीत आहे. गिधाड हा स्वच्छतेचे काम प्रभावीपणे पार पाडणारा निसर्ग अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वपूर्ण पक्षी आहे. निसर्गचक्रात मृत पावलेल्या प्राण्यांची विल्हेवाट लावणे, कुजलेले मांस खाणे हे गिधाडाचे काम आहे. मात्र गिधाडांचे प्रमाण कमी होत असल्याने मृत जनावरे खेडोपाडी रस्त्यावर पडून असतात. त्यातून रोगराई पसरु शकते. त्यामुळे गिधाडांसाठी संवर्धन क्षेत्र म्हणून अंजनेरीला मान्यता मिळाली आहे.

दुर्मिळ वनस्पतीं कशासाठी?

अंजनेरीचा परिसर हा आयुर्वेदिक आणि दुर्मिळ वनस्पतींसाठी नावाजलेला आहे. त्यामुळे या वनस्पतींच्या संवर्धनासाठी या भागात २००० एकर क्षेत्रावर संवर्धित क्षेत्र राखीव करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. या अभयारण्यांच्या धर्तीवर असलेल्या या संवर्धनामुळे दशमुळारिष्ट, मूरडशेंग, अश्वगंधा, कळलावी, सालवण, पिटवण, बेल, शिवण, कोरफड यांसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या औषधी वनस्पतींचे संरक्षण करता येईल. तसेच, या दुर्मिळ वनस्पतींची संख्या वाढविणेही आता शक्य होणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून स्वतंत्र निधी प्राप्त होईल.

पर्यावरणरक्षणासह वनविकास साध्य

संवर्धन क्षेत्रासमंजुरी मिळाल्याने अंजनेरी भागात असलेल्या विविध दुर्मिळ वनस्पती, वन्यजीवांचे विशेषत: गिधाडांचे संरक्षण करणे शक्य होणार आहे. पर्यटकांच्या दृष्टिकोनातून सोयीसुविधा, पर्यावरणतज्ञांच्या दृष्टिकोनातून पर्यावरण रक्षण तसेच वनविभागाच्या दृष्टिकोनातून विकास या सर्वच गोष्टी साध्य करण्यासाठी आता या संवर्धित क्षेत्रासाठी काही महिन्यात स्वतंत्र निधी प्राप्त होऊ शकेल. फेब्रुवारी अखेरीस संवर्धन क्षेत्र म्हणून अंजनेरीस मान्यता मिळाली. – रवींद्र भोगे, वनपरीक्षेत्र अधिकारी

First Published on: March 27, 2019 12:22 AM
Exit mobile version