प्रामाणिकपणा ! ‘सिव्हिल’मध्ये हरवलेले पाकीट मिळाले परत

प्रामाणिकपणा ! ‘सिव्हिल’मध्ये हरवलेले पाकीट मिळाले परत

पत्नीला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन आलेल्या पतीचे खिशातील पाकीट गहाळ झाल्याने पत्नीची काळजी घ्यायची की पाकीट शोधायचे या विंवचनेत असलेल्याचे पाकीट एका व्यक्तीला सापडले. त्याने ते पाकीट जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत आणून दिले. त्यानंतर पोलिसांनी पाकिटामधील कागदपत्रावरुन संबंधित व्यक्तीशी संपर्क साधत पाकीट परत केले. संकट काळात पाकीट परत मिळाल्याने संबंधित व्यक्तीला आनंदाश्रू अनावर झाले होते.

दिंडोरी तालुक्यातील हनुमंतपाडा येथील अंबादास पांडुरंग राऊत हे पत्नीला प्रसववेदना होत असल्याने दाखल करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात घेऊन आले होते. याचवेळी त्यांच्या खिशातील पाकिट रुग्णालय आवारात हरविले. या पाकिटात पाच हजार रुपये, आधारकार्ड व अन्य कागदपत्रे होती. सोमनाथ तुकाराम जाधव (रा. रौळसपिंप्री, ता. निफाड) यांच्या पत्नी रुग्णालयात उपचार घेत आहे. ते रुग्णालय आवारात असताना त्यांना शनिवारी (दि. ४) दुपारी १२ वाजता पाकिट नजरेस पडले. त्यांनी पाकिट जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत आणून पोलिसांना दिले.

चौकीतील ग्रामीण पोलीस दलाचे हवालदार अजय नाईक, शहर पोलीस दलाचे शिपाई संदीप माळेकर, हवालदार राऊत यांनी पाकीट तपासून बघितले. पाकिटामधील आधारकार्डव्दारे अंबादास राऊत यांच्याशी संपर्क साधला. त्याची खातरजमा करुन पाकीट त्यांना पोलीस चौकीत सुपूर्द केले. पत्नीवर उपचार चालू असतानाच हरवलेले पाकीट परत मिळाल्याने राऊत यांनी संबंधित व्यक्तीसह पोलिसांचे मन:पूर्वक आभार मानले.

First Published on: September 5, 2021 3:30 PM
Exit mobile version