राष्ट्रवादी वेलफेअर, आमदारांतर्फे मविप्र संस्थेला दीड कोटींची मदत

राष्ट्रवादी वेलफेअर, आमदारांतर्फे मविप्र संस्थेला दीड कोटींची मदत

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेवरील दायित्व कमी करण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने १ कोटीची देणगी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर केली. तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी स्वत:पासून सुरवात करून आपआपल्या रकमा संस्थेसाठी जमा करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर, आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रत्येकी पाच लाखांची तर, माजी खासदार देविदास पिंगळे आणि विश्वस्तांनी प्रत्येकी एक लाख रुपयाची देणगी दिल्यामुळे संस्थेेकडे दीड कोटी रुपये जमा झाले आहेत.
मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या परिवर्तन पॅनलने घवघवीत यश संपादन केले. या सर्व पदाधिकार्‍यांनी रविवारी (दि.4) मुंबईत शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली.मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटर येथे हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पगार, माजी खासदार देविदास पिंगळे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रा.बाळासाहेब पिंगळे हे उपस्थित होते. यावेळी मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड.नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती डी.बी.मोगल, चिटणीस दिलीप दळवी सत्कार करण्यात आला.
यावेळी पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करतांना संस्थेवर ६० कोटी कर्ज आणि इतर देणे ७० कोटी असे १३० कोटीचे दायित्व असल्याचे समजल्यानंतर याबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त करून संस्थेला आधी कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याच्या सूचना नूतन पदाधिकार्‍यांना दिल्या.समाजाकडून देणग्या गोळा करून कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. संस्थेच्या सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण संस्थेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचा विश्वास त्यांनी पदाधिकार्‍यांना दिला.यावेळी संचालक डॉ.सयाजीराव गायकवाड, रविंद्र देवरे, प्रविण जाधव, लक्ष्मण लांडगे, शिवाजी गडाख, संदीप गुळवे,अमित पाटील, डॉ.प्रसाद सोनवणे, रमेशचंद्र बच्छाव, नंदकुमार बनकर, कृष्णा भगत, विजय पगार, रमेश पिंगळे,यांच्यासह संस्थेचे सनदी लेखापाल राजाराम बस्ते, विजय गडाख, अशोक गायकवाड उपस्थित होते.

First Published on: September 4, 2022 5:14 PM
Exit mobile version