निवडणुकीने बारावीचा निकाल लांबणीवर

निवडणुकीने बारावीचा निकाल लांबणीवर

प्रातिनिधिक फोटो

बारावीच्या परीक्षा संपण्याच्या टप्प्यावर असून त्यासोबतच प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रियादेखील पूर्ण करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्राध्यापकांना निवडणूक कामासाठी वेळ द्यावा लागणार असल्याने त्याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यामुळे परीक्षा प्रणालीत कार्यरत असलेल्या शिक्षक व प्राध्यापकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी केली जाते आहे. किमान यंदाच्या वर्षापुरता शासनाच्या अन्य विभागातील कर्मचारी वृंदावर निवडणूक कामांची जबाबदारी देण्याची मागणीदेखील जोर धरत आहे. यासंदर्भात दाद मागणार असल्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे सरचिटणीस प्रा.संजय शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वीच छेडलेल्या असहकार आंदोलनामुळे उत्तरपत्रिका तपासणी, मुल्यमापणाच्या कामात विलंब झालेला आहे. एकीकडे बारावीच्या परीक्षा सुरू असताना निकाल वेळेवर लागावा, यासाठी तपासणी व मुल्यमापन प्रक्रियेला गती दिली जाते आहे. दहावीच्या परीक्षेलाही काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर लगेचच प्राध्यापकांना अकरावीच्या परीक्षेचे संयोजन करायचे आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणुक कामांमध्ये प्राध्यापक, शिक्षक गुरफटलेत तर मुल्यमापण प्रक्रिया प्रभावित होईल. निकाल जाहीर होण्यास विलंब होण्याची शक्यतादेखील व्यक्त करण्यात आली आहे.

निवडणूक कामातून सूट द्यावी

परीक्षा कामात असलेले प्राध्यापक, शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळायला हवे. यापूर्वीच्या काळात शासनाने यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्या असून परीक्षेचे संयोजन, मूल्यांकन प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी शासनाने प्राध्यापक, शिक्षकांना निवडणूक कामातून सूट द्यावी, अन्यथा न्याय मार्गाने लढा दिला जाईल. – प्रा. संजय शिंदे, सरचिटणीस, शिक्षक महासंघ

First Published on: March 11, 2019 12:43 AM
Exit mobile version