मालकाच्याच कारमधून १५ लाख लंपास करत चालक फरार

मालकाच्याच कारमधून १५ लाख लंपास करत चालक फरार

नाशिक: मालक सलूनमध्ये गेल्याची संधी साधत १५ लाखांची रोकड घेऊन फरार झालेल्या कारचालकास सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने सापळा रचून सोलापूरमध्ये अटक केली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी चालकाने धुळे, अहमदनगर, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, गुंटूर प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १३ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विकास उर्फ विक्की उत्तम मोकासे (वय ३१, रा.महाकाली चौक, पवन नगर, सिडको, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.

कारचालक मोकासे हा अली गुलामहुसेन सुराणी (रा. शिंगाडा तलाव, नाशिक) यांच्याकडे चालक म्हणून नोकरीस होता. अनेक वर्षांपासून नोकरी असल्याने सुराणींचा त्याच्यावर विश्वास होता. मात्र, त्या विश्वासाचाच कारचालकाने गैरफायदा घेतला. सुराणी हे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी कॅनडा कॉर्नर येथील वेलडन सलूनमध्ये कारने आले होते. त्यावेळी त्यांच्या कारचालकाने कारमधील १५ लाख रुपयांची रोकड लंपास केली. चालक चोरी केल्यानंतर कार लॉक करुन पळून गेला होता. याप्रकरणी अली सुराणींनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे, पोलीस नाईक नितीन थेटे, पोलीस शिपाई नाझीम शेख यांनी पारंपारिक व तांत्रिक विश्लेषणाआधारे तपास सुरु केला. चालक मोकासे धुळे, अहमदनगर, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, गुंटूर (आंध्रप्रदेश) व सोलापूर या ठिकाणी पळून गेल्याचे तपासात समोर आले. पथकाने चालकाला पकडण्यासाठी सोलापूरात सापळा रचला.

त्यावेळी तो आंध्रप्रदेशमध्ये होता. पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच तो आंध्रप्रदेशातून सोलापुरला आला. मात्र, तेच त्याला महागात पडले. पोलिसांनी त्याला सोलापुरात अटक केली. पथकाने त्याच्याकडून १२ लाख २५ हजार रुपयांची रोकड, चोरीच्या रकमेतून खरेदी केलेला एक ५४ हजार रुपयांचा आयफोन मोबाईल व एक लाख किंमतीची सोन्याची चेन असा एकूण १३ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक काकविपुरे करत आहेत.

पोलिसांनी केली १०० लॉजची तपासणी

कारचालकास पकडण्यासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक दिवसरात्र पारंपारिक व तांत्रिक विश्लेषणाआधारे त्याचा शोध घेत होते. मात्र, तो सतत ठावठिकाणा बदलत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पोलिसांनी धुळे, अहमदनगर, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, गुंटूरमधील सुमारे १०० लॉजची तपासणी केली होती.

First Published on: October 16, 2021 7:00 AM
Exit mobile version