लॉकडाऊन : तुरुंगातून बाहेर येताच ‘एक्साईज’च्या मद्य साठ्यावर मारला डल्ला; दोघांना अटक, पाच फरार

लॉकडाऊन : तुरुंगातून बाहेर येताच ‘एक्साईज’च्या मद्य साठ्यावर मारला डल्ला; दोघांना अटक, पाच फरार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आले असल्याने तळीरामांची अस्वस्थता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुरुंगातील 3 वर्षे वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या कैद्यांना सोडण्यात आले आहे. एका कैद्याने साथीदारांच्या मदतीने थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेल्या मद्यसाठ्यावरच डल्ला मारला. शनिवारी (दि.११) पेठरोडवरील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह परिसरातील गोदामातून चोरट्यांनी 3 लाख २६ हजार ४०० रुपयांचा ६८ बाँक्स मद्यसाठा लंपास केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ऋषिकेश फुलझळके यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली असून पाचजण फरार झाले आहेत.

मंगलसिंग मिस्तरी शिंदे (१९, रा. मच्छि बाजार, पेठ रोड, पंचवटी), रामदास बन्सीलाल पाडेकर (४०, फुलेनगर, पाटाजवळ, पेठ रोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

मंगलसिंग शिंदे यांच्यासह पाच ते सहा संशयितांनी मद्यसाठा चोरीचा कट रचला. पेठरोड परिसरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या  कार्यालयाच्या गोदामाचा पाठीमागील लाकडी दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरट्यांनी 68 बॉक्स लंपास केले. २०११ मध्ये भरारी पथकाने मध्यप्रदेशमध्ये उत्पादित होणारी सुपर मास्टर ड्राय झीन हे विदेशी मद्य शहादा येथून छापा टाकून जप्त केले होते. या मद्याचे सुमारे ३ लाख २६ हजार ४०० रुपये किमतीचे ६८ बॉक्स येथे होते. चोरट्यांनी यावरच डल्ला मारला. शनिवारी ही घटना उघडकीस येताच पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू करुन दोघा संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन बॉक्स हस्तगत केले आहेत. त्यांच्या अन्य साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू पोलीस उपनिरीक्षक कासरले करत आहेत.

शिंदे वाहनचोरीच्या गुन्हात तुरुंगात 

मंगलसिंग शिंदे हा संशयित वाहनचोरीच्या गुन्ह्यात  कारागृहात शिक्षा भोगत होता. देशभरात लॉकडाउन सुरू झाल्यानंतर सेट्रंलजेलमध्ये बंद असलेल्या कैद्यांपैकी किमान तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या आरोपींना बाहेर सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार तुरुंगातून बाहेर पडताच मद्यसाठ्यावर डल्ला मारला.

First Published on: April 12, 2020 6:12 PM
Exit mobile version