दोनशे कंपन्यांतील २५ हजार कर्मचारी जाणार संपावर

दोनशे कंपन्यांतील २५ हजार कर्मचारी जाणार संपावर

वेतन व सामाजिक सुरक्षा या मुद्यांसह खासगीकरण आणि कंत्राटीकरणाला विरोध करण्यासाठी येत्या ८-९ जानेवारीला कामगारांचा देशव्यापी संप होणार आहे. जिल्हयातील दोनशे कंपन्यांमधील २५ हजार कामगार संपात सहभागी होणार आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी भाजपशी संबंधित कामगार संघटनांना यातून वगळले आहे. ९ रोजी शहरातून मोर्चा काढणार असल्याची माहिती कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. सर्व क्षेत्रामधील सर्व प्रकारच्या कामगार, कष्टकर्‍यांना महागाई भत्त्यासह कमीत कमी १८ हजार रुपये किमान वेतन लागू करावे, यासह विविध १२ मागण्यांसाठी कामगार संघटनांनी यापुर्वी दोनवेळा एक दिवसांचा संप पुकारला.

१५ कोटी लोक संपामध्ये सहभागी होऊन देखील पंतप्रधान मोदी यांनी या संपाची दखल घेतली नसल्याबद्दल सिटू संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी नाराजी व्यक्त केली. या वेळी श्रीधर देशपांडे, आयटकचे राजू देसले, वीज कामगार संघटनेचे व्ही. डी. धनवटे, बॉश कंपनी संघटनेचे प्रवीण पाटील, क्रॉम्पटन ग्रिव्हजचे रावसाहेब ढेमसे, सिएटचे शिवाजी भावले, आशा प्रवर्तक संघटनेचे विजय दराडे, विमा कर्मचारी संघटनेचे मोहन देशपांडे, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघटनेचे आदित्य तुपे आदींसह विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. समितीच्या वतीने ८ जानेवारीला सर्व तालुक्यांमध्ये मोर्चे काढण्यात येणार आहेत. तर ९ जानेवारीला सकाळी साडे दहा वाजता अनंत कान्हेरे मैदान येथून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.

या आहेत मागण्या

महागाईवर नियंत्रण आणणारी प्रभावी पाऊले उचलावीत, बेरोजगारीवर नियंत्रण आणावे, कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, कामगारांना सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा लागू करावी, कष्टकर्‍यांना दरमहा सहा हजार रूपये पेन्शन द्यावी, कंत्राटीकरण थांबवावे यांसारख्या काही प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

First Published on: January 6, 2019 8:29 PM
Exit mobile version