राज्यात २७ टक्के पेरण्या

राज्यात २७ टक्के पेरण्या

राज्यात खरीपाच्या सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठ दिवसांपासून राज्यात पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडत आहे. कोकण विभाग वगळता अन्यत्र राज्यभर तुरळक पाऊस होत असून, हवामान शास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात मान्सून क्षीण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज घेऊन आणि जमिनीतील ओलावा पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या दिनांक २२ जून २०२१ च्या साप्ताहिक हवामान अंदाजानुसार पुढील आठवड्यात पश्चिम मध्य व दक्षिण भारतात मान्सून क्षीण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पूर्वीच कृषी विभागाने राज्यातील सर्व शेतकर्‍यांनी किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला दिला होता.
अपुर्‍या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतक-यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज पाहून व जमिनीतील उपलब्ध ओलावा पाहूनच पेरणी बाबत निर्णय घेण्याचे आवाहन केले जात आहे. राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून २२ जुन पर्यंत राज्यात सुमारे २७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत ३८ टक्के पेरण्या झाल्या होत्या.

First Published on: June 25, 2021 12:10 PM
Exit mobile version