दुचाकी धडकेत तीन तरूण ठार

दुचाकी धडकेत तीन तरूण ठार

अपघात

नाशिक रस्त्यावरील पांडव पेट्रोलपंपाजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तीन तरूण ठार झाले आहे. गुरुवारी (२९ ऑगस्ट) सकाळी 10 च्या दरम्यान ही घटना घडली.

पल्सर दुचाकी (एमएच-15-सीडी-6554) व अव्हेंजर दुचाकी (एमएच- 15- इएल -6889) पांडव पेट्रोलपंपाजवळ ओव्हरटेकच्या प्रयत्नात समोरासमोर धडकल्या. दोन्ही दुचाकीची धडक एवढी जोरात होती, की दोन्ही दुचाकी चक्काचूर झाल्या. यात संकेत माणिक बोडके (वय 18), महेश संतोष गांगोडे (वय 18 , रा. ढकांबे) व संदीप खंडू गांगुर्डे (वय. 23, रा. माळेदुमाला हल्ली, वणी) हे ठार झाले आहेत. संकेत बोडके व महेश गांगोडे हे ढकांबे येथून दिंडोरीत कॉलेजमध्ये प्रवेशासाठी येत होते.

संदीप गांगोडे हा वणीहून कामानिमित्त एकटाच दुचाकीवरुन जात होता. यावेळी समोरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी दुसर्‍या वाहनास ओव्हरटेक करीत असताना दोघा दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, ते मयत झाले होते. दिंडोरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

First Published on: August 29, 2019 11:54 PM
Exit mobile version