मालेगावात 30 नवे रुग्ण पॉझिटिव्ह

मालेगावात 30 नवे रुग्ण पॉझिटिव्ह

नाशिक जिल्हा प्रशासनास मंगळवारी (दि.१९) प्राप्त अहवालांमधील ३८ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यातील 30 रिपोर्ट हे एकट्या मालेगावातील असून, या बाधितांमध्ये ३ आणि ४ वर्षीय चिमुकल्यांचाही समावेश आहे. दरम्यान, नाशिक शहरातील वडाळा गावात एक ४५ वर्षीय रुग्ण करोनाबाधित आढळून आला आहे. हा रुग्ण कांदा व्यापारी असून तो, पिंपळगाव बसवंत येथून कांदा मुंबईत विक्री नेतो. आरोग्य विभागाने त्याच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन केले आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण करोनाबाधितांचा आकडा ८3८ वर जाऊन ठेपला असून, एकट्या मालेगावात ६४९ बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ६०१ रुग्ण बरे झाले असून, सध्या १८७ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

मालेगावातील 30 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १3 महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून मालेगावात दोन अंकी संख्येत नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले नव्हते. मात्र, मंगळवारी 38 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग हादरुन गेला आहे. तसेच, नाशिक महापालिकेच्या पथकाने वडाळा गावातील बाधित रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर सील केला आहे. दरम्यान, सोमवारी नाशिकरोड परिसरातील रेल्वे गार्डला कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर आता वडाळा भागातही शिरकाव झाल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे.
मंगळवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनास १०० रिपोर्ट प्राप्त झाले. यात ८ पॉझिटिव्ह रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यात चांदवड येथील ७ वर्षीय मुलगी, मनमाडचे -३, नांदूर शिंगोटे, रावळगाव, नांदगाव पोखरी आणि मालेगाव येथील प्रत्येकी एकाचा व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यातील ८३० करोनाबाधित रुग्णांपैकी ६०१ रुग्ण बरे झाले आहेत.

मंगळवारी ७३ रुग्ण दाखल

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ७३ संशयित रुग्ण उपचारार्थ रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यापैकी जिल्हा रुग्णालय ५, नाशिक महापालिका रुग्णालये १२, मालेगाव महापालिका रुग्णालये ४३, नाशिक ग्रामीण रुग्णालयांमध्ये १३ जण दाखल आहेत.

३६४ रिपोर्ट प्रलंबित

आरोग्य विभागातर्फे नाशिक जिल्ह्यातील ७ हजार ८२० संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ८३० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह व ६ हजार ६२६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ३६४ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. यात नाशिक ग्रामीण ४३, नाशिक शहर १६६ आणि मालेगाव शहरातील १५५ आहेत.

नाशिक शहरातील तीन प्रतिबंधित क्षेत्र निर्बंधमुक्त

नाशिक शहरातील तीन रुग्ण करोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे रुग्ण वास्तव्य करत असलेला परिसर १४ दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. या परिसरात १४ दिवसांचा कालावधी संपुष्टात आल्याने व नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे महापालिकेने माणेकशा नगर- व्दारका, गंगापूर रोडवरील शांतीनिकेतन चौक ऋषिराज प्राईड, सिडकोतील हनुमान चौक, आनंदवली येथील नवश्या गणपती प्रतिबंधित क्षेत्राचे निर्बंध हटवले आहेत. तसेच, देसले रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेली महिला करोनामुक्त झाली आहे. तिच्या संपर्कात आलेल्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे देसले रुग्णालय अलगीकरण केंद्र निर्बंध हटविण्यात आले आहेत.

नाशिक करोना अहवाल

पॉझिटिव्ह रुग्ण—–८३८
निगेटिव्ह रुग्ण——६६२६
मालेगाव ——–६४९ (मृत ४०)
नाशिक शहर——४८ (मृत २)
जिल्ह्याबाहेरील रुग्ण–३०
नाशिक ग्रामीण—–१११
(नाशिक तालुका ९, चांदवड ५, मनमाड ३, सिन्नर ९, दिंडोरी ९, निफाड १६, नांदगाव ७, येवला ३३, कळवण १, सटाणा २, मालेगाव ग्रामीण १६)

First Published on: May 19, 2020 7:18 PM
Exit mobile version