जिल्ह्यात 30 टक्के बालविवाह

जिल्ह्यात 30 टक्के बालविवाह

बालविवाह

नाशिक : प्रगतशील नाशिक जिल्ह्यात दरवर्षी होणार्‍या विवाहांंमध्ये 30 टक्के बालविवाह होत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषद यापुढे प्रयत्न करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास थेट जिल्हा परिषदेशी संपर्क साधल्यास तात्काळ पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात बालविवाहांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. बालविवाहानंतर महिलांना आरोग्य विषयक समस्यांचा सामना करावा लागतो. बालवयातच विवाह झाल्यास मुलिंना आपली स्वप्न पूर्ण करता येत नाहीत.

कमी वयातच त्यांना मातृत्व प्राप्त होत असल्याने जन्माला येणार्‍या बाळासोबतच आईच्या प्रकृतिची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. या सर्वांचा विचार केला तर बालविवाह रोखण्याची नितांत आवश्यकता आहे. नाशिक सारख्या प्रगतशील जिल्ह्यात 30 टक्के बालविवाह होत असल्याची माहिती एका संशोधनातून समोर आल्यानंतर सामाजिक संघटनांसह प्रशासकीय अधिकार्‍यांना धक्का बसला. बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून, ज्या ठिकाणी असे विवाह होत असल्याचे समजल्यास जिल्हा परिषदेला तात्काळ माहिती देण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जनतेला केले आहे.

नाशिक सारख्या प्रगतशिल जिल्ह्यात बालविवाह होणे हे अतिशय खेदजनक आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करणार आहे.-आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.

First Published on: December 9, 2022 10:36 AM
Exit mobile version