ठेकेदाराच्या चुकीमुळे शेतकर्‍याचा पालटून ३०टन कांदा पाण्यात

ठेकेदाराच्या चुकीमुळे शेतकर्‍याचा पालटून ३०टन कांदा पाण्यात

लासलगाव : निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील पिंपळगाव (नजीक) येथून कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा घेऊन येणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून ३० क्विंटल कांदा पाण्यात गेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे साईडपट्ट्यांचे अर्धवट काम करणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराविरुद्ध शेतीमाल घेऊन येणार्‍या उत्पादकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कांदा उत्पादक शेतकरी संदीप घोडे हा ट्रॅक्टरमधून कांदा विक्रीसाठी घेऊन येत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा फटका बसला. रस्त्यावरून ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने 30 क्विंटल कांदा हा संपूर्ण रस्त्याकडेला असलेल्या पावसाच्या पाण्यात भिजल्याने नुकसान झाले. लासलगाव-कोटमगाव रस्त्याच्या साईटपट्ट्या व्यवस्थित न भरल्याने बाजार समिती जवळच ट्रॉली उलटली. सुदैवाने, शेतकर्‍याला कुठलीही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे 42 गाव तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, राजेंद्र कराड व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बबन शिंदे यांनी ही माहिती लासलगाव बाजार समिती प्रशासनाला दिली. त्यानंतर बाजार समितीचे हमाल व कर्मचार्‍यांनी तातडीने धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने ट्रॉली सरळ करत सर्व कांदा त्या ठिकाणावरून उचलण्यासाठी कांदा उत्पादक शेतकर्‍याला मदत केली. मात्र, नुकसान झालेल्या कांद्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकरी संतोष घोडे यांनी केली आहे.

लासलगाव बाजार समितीसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरून कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने नुकसान झालेल्या कांद्याची नुकसान भरपाई बाजार समितीने भरून द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे 42 गाव तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, राजेंद्र कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बबन शिंदे यांनी बाजार समितीकडे केली.

First Published on: August 25, 2022 1:12 PM
Exit mobile version