नाशिक जिल्ह्यातील साडेचार हजार प्राथमिक शाळा १ डिसेंबरपासून होणार सुरू

नाशिक जिल्ह्यातील साडेचार हजार प्राथमिक शाळा १ डिसेंबरपासून होणार सुरू

नाशिक – कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर ग्रामीण भागात ५ वी ते १२ पर्यंतचे आणि शहरात इयत्ता ८ वी ते १२ पर्यंतचे वर्ग सुरु झाल्यानंतर आता १ डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार नाशिक शहरासह ग्रामीण भागातील साडेचार हजार शाळांची घंटा वाजणार आहे. या निर्णयामुळे आता सात लाख विद्यार्थी वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर शाळेत दाखल होणार आहेत.

नाशिक शहरात खासगी अनुदानित, विनाअनुदानित, महापालिकेच्या एकूण ७१२ प्राथमिक शाळा आहेत. तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या ३ हजार २६३ व खासगी शिक्षण संस्थांच्या ६६३ प्राथमिक शाळा आहेत. शहरात साधारणत: २ लाख विद्यार्थी तर, ग्रामीण भागात ५ लाख विद्यार्थी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेतात. ग्रामीण भागातील शाळा यापूर्वीच सुरु झाल्याने काही विद्यार्थी अगोदरच शाळेत येतात. पहिली ते चौथीपर्यंतचा निर्णय झाल्यामुळे सर्वच विद्यार्थी शाळेत येतील. त्यामुळे आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आता पूर्ण दिवस भरण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, शाळांनी आता सहकार्य करण्याची मागणी होत आहे.

शाळा सुरु करण्याची पालकांची मागणी होती. शिक्षण विभागाने अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. 15 जूनप्रमाणे १ डिसेंबर रोजी शाळांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जाईल. पालकांच्या व विद्यार्थ्यांच्यादृष्टिने अतिशय योग्य निर्णय राज्य सरकारने घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो.
– नंदलाल धांडे, मुख्याध्यापक, उन्नती प्राथमिक विद्यालय, नाशिक

First Published on: November 25, 2021 8:17 PM
Exit mobile version