नाशिक जिल्ह्यातील गंभीर वास्तव; सहा महिन्यांत रस्ते अपघातांत ४१५ बळी

नाशिक जिल्ह्यातील गंभीर वास्तव; सहा महिन्यांत रस्ते अपघातांत ४१५ बळी

प्रातिनिधिक फोटो

बेशिस्त वाहनचालक, वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दूरवस्था यामुळे जिल्ह्यात रस्ते अपघातांत मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत जिल्ह्यात 380 रस्ते अपघात झाले असून, 415 वाहनचालकांचा बळी गेला आहे. म्हणजेच जिल्ह्यात रोज दोन वाहनचालकांचा रस्ते अपघातांत मृत्यू होत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक ग्रामीण पोलीस व सामाजिक संस्थांच्या मदतीने शाळा, महाविद्यालये, बसस्थानके आदी ठिकाणी व्यापक स्वरूपात जनजागृती केली जात आहे. मात्र, त्याकडे बेशिस्त वाहनचालक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण पोलिसांनी हेल्मेटसक्ती कारवाई करताना दंडाऐवजी हेल्मेट खरेदीची सक्ती केली. त्याचा जिल्ह्यात सकारात्मक परिणाम दिसून आला. अनेक दुचाकीचालकांनी हेल्मेट तत्काळ खरेदी केले. मात्र, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे अपघात संख्येवरून दिसून येत आहे.

जानेवारी ते जून २०१८ मध्ये एकूण 868 अपघात झाले आहेत. यात ४२३ जीवघेणे अपघात असून, ४५५ मृत्यूमुखी, ५८८ गंभीर जखमी व १२३ किरकोळ जखमी झाले आहेत. जानेवारी ते जून २०१९ मध्ये 708 अपघात झाले आहेत. यात 380 जीवघेणे अपघात झाले असून, यात ४१५ मृत्यूमुखी, ३३० गंभीर जखमी आणि ३०९ किरकोळ जखमी झाले आहेत.

प्रबोधनाचा सकारात्मक परिणाम

जिल्हा वाहतूक शाखेतर्फे 45 पोलीस हेल्मेटसक्ती, वाहतूक नियमांबाबत सातत्याने जनजागृती करत आहेत. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जावे, यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्येदेखील जनजागृती केली जात आहे. याचा सकारात्मक परिणाम जाणवत आहे. मुलांकडूनच पालकांना नियमांचे पालन करण्याबाबत सांगितले जात असल्याचे दिसून येत आहे.
– विपीन चौधरी, जिल्हा वाहतूक शाखा

महिनेनिहाय अपघात

महिना – अपघात (मृतांची संख्या)
जानेवारी – 128 (73)
फेब्रुवारी – 106 (74)
मार्च – 124 (75)
एप्रिल – 100 (55)
मे – 149 (97)
जून – 101 (41)
एकूण – 708 (415)

First Published on: July 14, 2019 8:50 AM
Exit mobile version