नाशिक जिल्ह्यात ४७९ गंभीर कुपोषीत बालके

नाशिक जिल्ह्यात ४७९ गंभीर कुपोषीत बालके

राज्यातील बालमृत्यूंचं प्रमाण घटलं

कुपोषणमुक्त भारत घडवण्याच्यादृष्टीने अनेक प्रयत्न होत असले तरी, जिल्ह्यात कुपोषण हद्दपार करण्यात सरकार अद्याप यश प्राप्त झालेले नाही. नाशिक जिल्ह्यात ४७९ तीव्र गंभीर कुपोषित (सॅम) बालकांचे प्रमाण असून, साडेसात हजार बालकांच्या वजन चिंताजनक असल्याचे कुपोषण निर्मुलन प्रकाल्पांच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषद एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांचे वजन मोजले जाते. डिसेंबर २०१८ पर्यंत नाशिक जिल्ह्यातील आदिवासी व बिगर आदिवासी तालुक्यांमधील तीन लाख ४६ हजार ६४७ बालकांचे वजन करण्यात आले. यातील दोन लाख ८२ हजार बालके सदृढ निघाले असून, साडेसात हजार बालकांचे वजन हे त्यांच्या वयाच्या प्रमाणात अत्यंत कमी आहे. या विद्यार्थ्यांचे वजन वाढीसाठी विशेष आघार सुरू करण्याचे निर्देश महिला व बालकल्याण विभागातर्फे देण्यात आले आहेत. जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कायम असून, ४७९ बालके तीव्र गंभीर कुपोषित असल्याचे या पाहणीत दिसून आले. विशेषत: आदिवासी तालुक्यांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे.

पेठ, हरसूल, सुरगाणा, इगतपुरी, कळवण, त्र्यंबक, बागलाण आदिवासी तालुक्यांमध्ये २९१ कुपोषित बालके आढळली आहेत. बिगर आदिवासी तालुक्यात १८८ कुपोषीत बालके असल्याचे दिसून येते. कुपोषणाचे प्रमाण आदिवासी भागातील बालकांमध्ये जास्त आहे. जिल्ह्यात २ हजार ७३० मध्यम गंभीर कुपोषित (मॅम) बालके म्हणून आढळले आहे. बिगर आदिवासी भागात ११४८ ‘मॅम’ बालके असून, आदिवासी भागात हे प्रमाण तुलनेने कमी दिसते.

जिल्ह्यातील ८८ टक्के बालके सदृढ

नाशिक जिल्ह्यातील पाच वर्षापर्यंतची दोन लाख ८२ हजार १५२ बालके सदृढ असल्याचे कुपोषण निर्मुलन प्रकल्प अधिकार्‍यांच्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. यात बिगर आदिवासी क्षेत्रातील ९१.१८ टक्के बालकांचा समावेश असून, आदिवासी भागातील ८७.३९ टक्के बालकांचा समावेश आहे. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक ९५ टक्के सदृढ बालके जन्माला आल्याचे या सर्वेक्षणाअंती दिसून येते.

प्रकल्पनिहाय कुपोषित बालके

पेठ-३९, हरसूल-४४, सुरगाणा-१०, बार्‍हे-२४, इगतपुरी-३४, दिंडोरी-६, उमराळे-२०, कळवण-१४, नाशिक-२८, त्र्यंबकेश्वर-२०, देवळा-१४, बागलाण-६९, सिन्नर-२२, निफाड-१५, मनमाड-१८, पिंपळगाव-११, येवला-२७, नांदगाव-१९, चांदवड-२६, मालेगाव-१९

First Published on: February 8, 2019 10:47 PM
Exit mobile version