कॉलेजेस सुरू; मात्र पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा टप्पा!

कॉलेजेस सुरू; मात्र पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा टप्पा!

नाशिक – वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर कॉलेज बुधवार (दि.20) पासून सुरु झाले तरी बहुतांश विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी टप्पा दिल्याने महाविद्यालयांचे कॅम्पस ‘सुने सुने’च दिसून आलेे. विद्यार्थ्यांमध्ये सुट्यांचा मूड असल्याने दिवाळीनंतरच खर्‍या अर्थाने लेक्चर सुरु होतील, असे दिसून येते.

शाळा व कनिष्ठ महाविद्यालये ४ ऑक्टोबरपासून सुरु झाल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासह कला, वाणिज्य व विज्ञान या नियमित अभ्यासक्रमाचे कॉलेजही सुरू करण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला. त्यानुसार बुधवारी (दि. २०) पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलवण्यात आले. साधारणत: वर्षभरानंतर कॉलेज सुरु होत असल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर दिसून आला. तसेच अनेक दिवसांनी मित्र, मैत्रीनी भेटल्याने गप्पा-गोष्टी करण्यास पुरेसा वेळ मिळाला. महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु असल्यामुळे त्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरु आहे. एकंदरीत, ऑनलाईन शिक्षणापासून सुटका होऊन प्रत्यक्ष कॉलेज सुरु झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांना आहे. परंतु, दिवाळीनंतरच खर्‍या अर्थाने कॉलेज कॅम्पस गजबजतील.

महाविद्यालयांकडून काळजी

कोरोना नियमांचे पालन करुन विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये प्रवेश देण्यासाठी महाविद्यालयांनी चोख बंदोबस्त ठेवला. मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य होते. तसेच पहिला किंवा दुसरा डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आला. तसेच विनाकारण फिरणार्‍या विद्यार्थ्यांनाही प्रतिबंध करण्यात आला.

महाविद्यालये आजपासून सुरु झालेली असली तरी विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित आहे. कॉलेजमध्ये सॅनिटायझेशन, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये दिवाळी सुट्यांचा मूड असल्यामुळे दिवाळीनंतरच खर्‍या अर्थाने महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरु होतील. – व्ही. एन. सूर्यवंशी, प्राचार्य, एचपीटी-आरवायके महाविद्यालय

First Published on: October 20, 2021 10:42 PM
Exit mobile version