आदिमायेचा कीर्तिध्वज : ५०० वर्षांची परंपरा लॉकडाऊनमध्येही कायम

आदिमायेचा कीर्तिध्वज : ५०० वर्षांची परंपरा लॉकडाऊनमध्येही कायम

कळवण – साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर विजयादशमीनिमित्त सप्तशृंगी देवीची विधिवत पूजा करण्यात येऊन नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात आली. विजयादशमीला मोठ्या उत्साहात देवीच्या नवरात्रोत्सवाची सांगता दरवर्षी होत असते. यंदा मात्र कोरोनामुळे भाविकांना गडावर प्रवेश बंदी करण्यात आली असल्याने भविकांविना सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या वतीने देवीची महापूजा करण्यात आली.

दरम्यान, शनिवारी कीर्तिध्वजाची मिरवणूक काढण्यात आली. न्यासाच्या कार्यालयापासून सप्तशृंगदेवीच्या पहिल्या पायरीपर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. तहसीलदार बंडू कापसे यांच्या हस्ते ध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले. व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, राजेश गवळी, गिरीश गवळी, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, भिकन वाबळे व कीर्तिध्वजाचे मानकरी गवळी कुटुंबीयाचे सदस्य उपस्थित होते. गडावर यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रोच्चारात हवनकुंड प्रज्वलित झाल्यानंतर उशिरापर्यंत विधी सुरू होता. या कार्यक्रमास पुरोहित वर्गाव्यतिरिक्त इतरांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. या दरम्यान सायंकाळी आरतीनंतर गवळी कुटुंबीय मानकरी कीर्तिध्वज व पूजेचे साहित्य घेऊन शिखरावर मार्गक्रमण करण्यास प्रारंभ करण्यात आला. गडावर रात्री उशिरा कीर्तिध्वज रोहणानंतर ध्वजाच्या दर्शनानंतर नवरात्र उत्सवाची सांगता होते, असे प्रतिवर्षीचे नियोजन परंपरेनुसार यंदाही पार पडले.

दरम्यान, यावेळी यात्रोत्सव कोरोनामुळे रद्द झाल्यामुळे गडावर प्रवेशबंदी असल्याने प्रशासनाने कोजागरी पौर्णिमा व तस्सम कार्यक्रम रद्द केले आहेत. दहा फूट लांबीची काठी ११ मीटरचा केशरी रंगाचा ध्वज, गहू, तांदूळ, खोबर्‍याच्या वाट्या, पूजेचे साहित्य असे सर्व घेऊन दरेगावचे कीर्तिध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी हे शिखरावर घेऊन ध्वजारोहणाची परंपरा पार पडली.

First Published on: October 25, 2020 10:59 PM
Exit mobile version