तब्बल ७ लाख नागरिकांना अद्याप दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

तब्बल ७ लाख नागरिकांना अद्याप दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

प्रातिनिधीक फोटो

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा साठा मर्यादित प्रमाणात होत असल्याने जिल्ह्यातील ३ लाख ६ हजार २५१ नागरिकांना आतापर्यंत दोन्ही डोस मिळाले आहेत. तर १० लाख ६९ हजार नागरिकांना पहिला डोस मिळाला. अशा परिस्थितीत लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यात २५० केंद्र सुरु केले आहेत.

जानेवारीच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ४५ ते ६० या वयोगटातील नागरिकांचे सर्वाधिक लसीकरण झाले आहे. या वयोगटातील ४ लाख ११ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून त्यातील १ लाख २० हजार ७५४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्या खालोखाल ६० वर्षावरील २ लाख ९४ हजार ४०२ नागरिकांना पहिला डोस व १ लाख पाच हजार ८९२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणच्या चौथ्या टप्प्यात परवानगी देऊनही १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचेही बर्‍यापैकी लसीकरण झाले आहे. या वयोगटातील दोन लाख १ हजार ४३९ नागरिकांना पहिला डोस व ८६४६ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आरोग्य व इतर विभागांमधील फ्रंटलाईन कर्मचारी-अधिकार्‍यांना पहिल्या टप्प्यापासून लसीकरण केले जात असल्याने त्यांचे लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाले आहे. आतापर्यंत १ लाख ७४ हजार ११६ कर्मचार्‍यांचे आतापर्यंत लसीकरण झाले आहे.त्यानंतर टप्प्याटप्प्याने ६० वर्षावरील, ४५ ते ६० वयोगटातील व १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यास सरकारने परवानगी दिली. देशात आतापर्यंत ३७ कोटी डोस देण्यात आले असून महाराष्ट्रातही ही संख्या तीन कोटींपेक्षा अधिक आहे. या लसीकरणासाठी आरोग्यविभागाने ६०० लसीकरण केंद्र सुरू करण्याचे नियोजन करून त्या प्रमाणात कर्मचाऱी व अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले आहे. मात्र, लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना प्रतीक्षा आहे.

First Published on: July 14, 2021 7:00 AM
Exit mobile version