नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनिसांची 939 पदे रिक्त

नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनिसांची 939 पदे रिक्त

नाशिक : कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात महत्वाची भूमिका निभावणार्‍या अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या तब्बल ९३९  जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरण्याची परवानगी द्यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत बुधवारी (दि.१६ ) करण्यात आला.

महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची मासिक सभा पार पडली. यावेळी सदस्यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या रिक्त जागांचा मुद्दा उपस्थित झाला. जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या १७९ , मदतनीसांच्या ७३८ तर मिनी अंगणवाडी सेविकांच्या २२  जागा रिक्त आहेत. त्यामुळे पोषण आहार वेळेत मिळत नसल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. शासनाने भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवण्याची मागणी या सभेत करण्यात आली.

यावेळी समिती सदस्या कविता धाकराव, रेखा पवार, सुनिता सानप, गितांजली पवार-गोळे, कमल आहेर, गणेश अहिरे, मनिषा पवार, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे उपस्थित होते. दरम्यान, राज्यातील महिला व बालकल्याण विभागाने डिसेंबर २०१९  पर्यंत रिक्त असलेल्या जागांची भरती प्रक्रिया राबवण्यास मंजूरी दिली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने जिल्ह्यातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली.

त्यासाठी उमेदवारांच्या वयोमर्यादेत दोन वर्षांची वाढ करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन निवड झालेल्या व्यक्तींना नियुक्तीपत्रही देण्यात आले आहे. त्यानंतर म्हणजेच २०२०  व २०२१  या दोन वर्षात रिक्त झालेल्या अंगणवाडी सेविका, मिनी सेविका आणि मदतनिस यांच्या रिक्त झालेल्या जागांची भरती करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात एकूण ४  हजार ७७६ अंगणवाडी केंद्र आहेत.

First Published on: February 17, 2022 8:15 AM
Exit mobile version