बालभारतीचे 95 लाख पुस्तके ‘लॉगडाऊन’

बालभारतीचे 95 लाख पुस्तके ‘लॉगडाऊन’

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील शैक्षणिक वर्ष नेमके कधी सुरु होईल याबाबत अंदाज बांधणे कठीण होऊन बसले आहे. आशा परिस्थितीत शाळांना पुस्तकांचा पुरवठा केव्हा करणार? या आदेशाची प्रतिक्षा ‘बालभारती’ला लागून आहे. नाशिकच्या भांडारगृहात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे तब्बल 95 लाख 89 हजार पाठ्यपुस्तके ‘लॉकडाऊन’ झाले आहेत.  लॉकडाऊनला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता शाळा उघडण्याची प्रतिक्षा लागली आहे. परंतु, शाळा, महाविद्यालये सुरु होण्यास अजून महिना, दोन महिने अवधी लागणार असल्याचे दिसते. सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य अभ्यासमंडळाची पुस्तके मोफत दिली जातात. नाशिक जिल्ह्यात 30 लाख 24 हजार 893 पुस्तके वितरीत केली जातील. तसेच नाशिक शहरात 5 लाख 97 हजार विद्यार्थ्यांना बालभारतीचे पुस्तके देण्यात येणार आहेत. मात्र,करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरात पाठ्यपुस्तकांचे वाटप कसे करायचे, हा सर्वात मोठा पेच बालभारतीसमोर निर्माण झाला आहे. वाटप करण्याचे आदेश मिळाल्यास सुरुवातीला करोनाचा प्रार्दुभाव कमी असलेल्या भागात वाटप सुरु होईल. त्यानंतर ‘हॉटस्पॉट’च्या ठिकाणी पुस्तके पोहचवण्यात येणार आहेत. प्रत्येक वर्षी साधारणत: मे महिन्यात वाटप सुरु होते आणि जूनमध्ये शाळा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचतात. करोनामुळे आता शाळा उशिरा उघडणार असल्याने पाठ्यपुस्तकेही पाठवण्यास उशिर होणार आहे. सोमवारी (दि.18) लॉकडाऊनचे चौथे चरण सुरु होत असल्याने यात भांडारगृहास पुस्तके वितरणास परवानगी मिळण्याची अपेक्षा लागून आहे.

लॉकडाऊन संपल्यानंतर पाठ्यपुस्तके वितरणास परवानगी मिळू शकते. भांडारगृहात सर्व पुस्तके उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे वितरणाचे आदेश केव्हा मिळतात याकडे लक्ष लागून आहे.
-पी. एम. बागुल, भांडार व्यवस्थापक (बालभारती नाशिक)

First Published on: May 15, 2020 7:51 PM
Exit mobile version