मध्यप्रदेशातील दरोडेखोरांची टोळी जेरबंद

मध्यप्रदेशातील दरोडेखोरांची टोळी जेरबंद

अटक केलेल्या दरोडेखोरांसमवेत पोलिसांचे पथक

२१ जानेवारीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार एक सिल्वर रंगाची मारुती अल्टो कार (एमपी- ३९- सी-३०४७) व एका निळ्या रंगाच्या विना क्रमांकाची बलेनो कारमधून काही इसम तलवारी, दांडके सोबत घेऊन दरोडा टाकण्यासाठी नगर- मनमाड रोडने शिर्डीच्या दिशेने येणार असल्याची महिती मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी पथकाने २२ जानेवारीला रात्री १२ वाजेच्या सुमारास निघोज फाटा, बायपास रोड शिर्डी येथे सापळा लावून सदर कारमधील सहा संशयिताना ताब्यात घेतले.

दिलीप मानसिंग सिसोदिया (वय. ३०), नवीन प्रेमनारायण भानेरीया (वय ३२) ,मोहनसिंग गोपालसिंग सिसोदिया (वय २२), प्रदीप मानसिंग सिसोदिया (वय २८), आशिष कुमार अनुपसिंग छायन (वय २०), अभिषेक विनोद सिसोदिया (वय. २०, सर्व रा.कडीया, जिल्हा राजगढ, मध्यप्रदेश) असे संशयिताचे नाव आहेत. त्यांच्याकडून तलवार, सत्तूर, चार लाकडी दांडके मोबाईल, १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ६ तोळे वजनाच्या ४ सोन्याच्या बांगड्या असा एकूण १० लाख १ हजार ७५० रुपये किमतीच्या मुदेमाल जप्त केला. दरम्यान मध्यप्रदेशातील टोळ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये येऊन लग्नसमारंभात चोर्‍या करतात. वरील सर्व आरोपींनी ३० डिसेंबर २०१८ला शिर्डीत झालेल्या विवाह सोहळ्यातून सुमारे ५५ तोळे सोन्याचे दागिने चोरी केल्याचे कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना.विशाल दळवी यांनी शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना राहता येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मिथुन घुगे करीत आहे.

First Published on: January 23, 2019 7:40 PM
Exit mobile version