विल्होळी धरणालगत चार एकर जागेवरील रिसॉर्ट वादाच्या भोवर्‍यात

विल्होळी धरणालगत चार एकर जागेवरील रिसॉर्ट वादाच्या भोवर्‍यात

नाशिक : नाशिक-विल्होळी धरणालगत बांधण्यात येत असलेले तब्बल चार एकर जागेवरील रिसॉर्टचे बांधकामच अनधिकृत असल्याची तक्रार जमिनीच्या मूळ मालकांच्या वारसांनी केली आहे. शहरातील सुप्रसिद्ध बिल्डर स्वप्नील सराफ यांचा हा प्रकल्प असून, या तक्रारीमुळे हे बांधकाम वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. ज्या भूखंडावर रिसॉर्टचे बांधकाम सुरू आहे तो भूखंड मूळचा आदिवासी असून सराफ यांनी फसवणूक करून खोटे दस्तावेज तयार करून खरेदी घेतली असल्याने त्यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी वजा तक्रारही पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

विल्होळी येथील धरणालगत सर्व्हे नंबर 89 /3/अ यावर त्यांचे रिसॉर्टचे बांधकाम सुरू आहे. हे रिसॉर्ट ज्या भूखंडावर बांधले जात आहे ती जागाच मुळात आदिवासी असून महसूल यंत्रणेला हाताशी धरून चुकीच्या पद्धतीने परवानग्या मिळवत जमिनीची बेकायदेशीर पद्धतीने खरेदी केली असल्याचा दावा तक्रारदार बबन ढगे यांनी केला आहे. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार स्वप्नील सराफ यांनी खरेदी केलेल्या जमिनीत तक्रारदाराचा वारसाहक्काने अधिकार असताना तक्रारदाराची किंवा त्यांच्या वडिलांची संमती घेतली नाही. तसेच, जमीन खरेदी करण्यासाठी महसूल अधिकार्‍यांना हाताशी धरून मिळकतीच्या इतर अधिकारात असलेला 36 व 36 चा शेरा काढून टाकला आहे.

इतकेच नाही तर उपविभागीय अधिकारी यांच्याकडून क्रमांक ज मा/ एन ए एस आर/63/2015 आदेश दि. 27 जुलै 2017 अन्वय सर्वे नंबर 89/3/अ पैकी 13300.00 सर्वे नंबर 89/4 पैकी 5600.00 चौरस मीटर सर्वे नंबर 89/6 पैकी 4000.00 असे एकूण 22900.00 चौ.मी क्षेत्र वाणिज्य बिनशेती असा बेकायदेशीर आदेश प्रमाणित करून घेतला आहे. त्याच बरोबर गट क्रमांक 89/6 बाबत सराफ यांनी 0.40 आर क्षेत्रासह धारकांना हाताशी धरून मोबदला रक्कम रुपये 1 कोटी 8 लाख 17 हजार देऊन बोगस विकसन करारनामा करून घेतला असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आदिवासी जमीन खरेदी विक्री संदर्भातील शासकीय नियम अत्यंत कठोर असताना मंत्रालयातील परवानगी आवश्यक असताना स्वप्नील सराफ यांनी स्थानिक महसूल यंत्रणेला हाताशी धरून स्थानिक पातळीवरील परवानगी घेत जमीन खरेदी केली आहे.

तक्रारदाराचे वडील, आजोबा अशिक्षित असल्याने त्याचा फायदा घेत सराफ यांनी बनावट कागदपत्र व अनधिकृत परवानगी घेऊन तक्रारदाराच्या अधिकारावर गदा आणली असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून बनावट दस्तऐवज तयार करून जमीन हडपण्याचा उद्देशाने त्यावर बेकायदेशीर बांधकाम सुरू केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सराफ यांच्या विरुद्ध तक्रार दाखल झाल्याने रिसॉर्टच्या बांधकामामध्ये गुंतवणूक केलेल्या अनेक गुंतवणुकदारांचे धाबे दणाणले आहे.

विल्होळी येथील जमिनीसंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याची वस्तुस्थिती आहे. सदर जमीन आम्ही 30 वर्षांपूर्वी नियमाने खरेदी केली आहे. त्याबाबत आम्ही आमचा जबाब संबंधित पोलीस ठाण्यात नोंदविला आहे. : स्वप्निल सराफ, बांधकाम व्यावसायिक

विल्होळी येथील रिसॉर्टसंदर्भात स्वप्निल सराफ यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याची चौकशी सुरु आहे. : व्ही. एस. कोठावळे, सहायक पोलीस निरीक्षक

First Published on: September 6, 2022 1:31 PM
Exit mobile version