रेशीम धाग्यांनी गुंफले अनोखे नाते; बाजारपेठा, बसस्थानके गजबजली

रेशीम धाग्यांनी गुंफले अनोखे नाते; बाजारपेठा, बसस्थानके गजबजली

नाशिक : बहीण-भावाच्या अतूट आणि हळव्या नात्याला रेशीम धागा बांधून अधिक दृढ करत घरोघरी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा झाला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने परगावाहून हजारो बहिणी रविवारी शहरात आल्या, तर अनेकांनी परगावी, परदेशात राख्या पाठवून भावांना शुभेच्छा दिल्या.

भावा बहिणीचे नाते दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. यानिमित्ताने शहरातील बाजारपेठाही विविधरंगी राख्यांनी सजल्या होत्या. बुधवारी घरोघरी राखीपोर्णिमा साजरी करण्यात आली. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ असल्याने अनेकांनी रात्री ९ वाजेनंतर रक्षाबंधन साजरे केले. यावेळी रेशमी धाग्यांनी भावा बहिणीचे हे नाते अधिक दृढ करत बहिणीने भावाच्या आरोग्य, सुखी, संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली. काही बहिणींनी भावांकडे जात तर काही भावांनी बहिणीकडे जावून राखी बांधून घेतली. सोशल मिडीयावरही शुभेच्छांचा वर्षाव होत होता.

सकाळपासूनच राख्या आणि गिफ्टच्या खरेदीसाठी शहरातील प्रमुख मार्गावरील बाजारपेठा बहरून गेल्या होत्या. भेटवस्तूंबरोबरच चॉकलेट्स, मिठाई तसेच गोड पदार्थांनाही मोठी मागणी राहिली. परंपरेनुसार शहरात घरोघरी रक्षाबंधन साजरा होत असतानाच विविध संघटनांनीही सण उत्साहात साजरा केला. ऑनलाईन रक्षाबंधनाचा बंध अनेकांनी जपला. बहिणींनी औक्षण केल्यानंतर भावांनी भेटवस्तू देत बहिणींना खूश केले. काही ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत सैनिक, पोलिस कर्मचारी यांना राख्या बांधत आपुलकीचा बंध जोडला गेला. तसेच समाजातील दुर्बल घटकांना मदतीचा हात दिला. बहीण-भावाचे अतूट नाते अधिक दृढ करत रक्षाबंधनाचा सण आज शहरात उत्साहात साजरा केला.

भद्रा काळामुळे संभ्रम

रक्षाबंधनाच्या दिवशीच असलेला भद्रा काळ तर काही ज्योतीषतज्ञांनी भद्रा काळातही राखी बांधण्यास हरकत नसल्याचे सांगितल्याने नागरिकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला. बुधवारी रात्री ९ वाजेपर्यंत भद्राकाळा असल्याने त्यानंतर राखी पोर्णिमा साजरी करण्यास हरकत नसल्याचेही मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने अनेकांनी रात्री ९ वाजेनंतर राखी पोर्णिमा साजरी केली. अनेकांनी याबाबत कोणताही संभ्रम न बाळगता राखी पोर्णिमा साजरी केली तर अनेक कुटुंबात ३१ ऑगस्ट रोजी राखी पोर्णिमा साजरी करण्यात येणार आहे.

बसस्थानके गजबजली

लाडक्या भाउरायाच्या भेटीची आस असलेल्या माहेरवाशिणींची माहेरी जाण्यासाठी बस स्थानकांवर मोठी गर्दी दिसून आली. त्यामुळे शहरातील ठक्कर बझार, सीबीएस, महामार्ग बसस्थानके गर्दीने फुलले होते. बाहेरगावी जाणारया गाडयांमध्ये मोठयाप्रमाणावर महिला वर्गाची गर्दी दिसून आली.

First Published on: August 30, 2023 8:19 PM
Exit mobile version