वर्ष लोटले प्रशासन कधी जागे होणार?; स्व. श्रीकांत ठाकरे तरण तलावाची दुरुस्ती संपेना

वर्ष लोटले प्रशासन कधी जागे होणार?; स्व. श्रीकांत ठाकरे तरण तलावाची दुरुस्ती संपेना

स्वप्निल येवले । पंचवटी

नाशिक महापालिकेचे जवळपास सर्व विभागातील जलतरण तलाव कोरोना निर्बंध शिथिल केल्या नंतर संपूर्ण क्षमतेने सुरु झाले होते. तर दुसरीकडे पंचवटी परिसरातील स्व. श्रीकांत ठाकरे जलतरण तलाव मात्र कोरोना काळाच्या अगोदर पासूनच बंद अवस्थेत असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली होती. गेल्या वर्षी काही सामाजिक संस्थांनी महापालिकेला निवदेन देत तो सुरु करण्याची मागणी केली होती. त्यावर महापालिकेकडून उशिरा का होईना पण दुरुस्तीचे काम सुरु केले असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

पंचवटी परिसरातील मीनाताई ठाकरे स्टेडीयमच्या परिसरात असलेल्या स्व. श्रीकांत ठाकरे जलतरण तलाव समस्यांनी वेढला होता. येथील तलावाच्या आजूबाजूला असलेल्या खोल्यांच्या काचा तुटलेल्या तर दुसरीकडे, प्रचंड गवत याठिकाणी वाढले होते. नियमित देखभाल होत नसल्यामुळे विद्रूप स्वरूप या जलतरण तलावाला प्राप्त झाले होते. तर दुसरीकडे जलतरण तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या व पाण्याच्या बाटल्यांचा खच असल्याचे नजरेस पडले. गेल्या तीन चार वर्षांपासून जलतरण तलाव बंद अवस्थेत असून तिथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याने मद्यपीना आयती संधीच जणू मिळाली होती. मद्यपीना रात्रभर दारू पिण्यासाठी अगदी सुरक्षित आणि कोणाचाही त्रास न होणारी जागाच महापालिकेच्या माध्यमातून मिळाली होती.

खरतर या जलतरण तलावाकडे येण्यासाठी विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रवेश द्वारातूनच मध्ये प्रवेश करता येत असतो. विभागीय क्रीडा संकुलासाठी तरी सुरक्षा रक्षक नेमलेला असावा. जर त्याच्या समोर असे दारूच्या पार्ट्या तेथे रंगत असतील तर त्या पार्ट्यांमध्ये त्यांचा देखील सहभाग असण्याबाबत दुमत नाही. या दारूच्या नशेत काही अनुचित प्रकार तिथे घडला नाही हे सुदैव. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी ठेकेदाराच्या माध्यमातून जलतरण तलाव दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे बघायला मिळते. खरेतर महापालिकेकडून उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच या जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. जेणेकरून उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना त्याचा वापर करता आला असता आणि महापालिकेला देखील उत्पन्न मिळाले असते.

काही दिवसांवर पावसाळा आलेला आहे तसेच जून महिन्यात नियमित शाळा आणि महाविद्यालये सुरु होतील. त्यामुळे पावसाळा सुरु झाला की, तीन ते चार महिने जलतरण तलाव बंद होतील आणि शाळा व कॉलेज नियमित सुरु झाले की, येणारे जलपटूची संख्या देखील कमी होईल. सध्या तलाव परिसरातील काम अंतिम टप्प्यात आले असून कारागिरांकडून टँक परिसरात स्वच्छतेचा अखेरचा हात फिरवला जात आहे. तर शॉवर रूम आणि लॉकर रूम मध्ये देखील रंगरंगोटी व सिलिंग दुरुस्तीचे काम सुरु आहे. जलतरण तलाव कार्यालयाच्या भिंतीवरच्या काही ठिकाणी टाईल्स तुटलेल्या असल्याने त्या बसविण्याचे काम अजून सुरु होणे बाकी आहे. त्या करता लागणार्‍या टाईल्स या तिथे उपलब्ध असल्याचे दिसते. तर जलतरण तलावाच्या इमारतीला बाहेरून तसेच प्रवेशद्वाराला रंगाचे काम पूर्ण झाले.

वाळलेले गवत जाळले

एकीकडे सामान्य जनतेकडून जर उघड्यावर कचरा जाळण्यात आला तर त्याच्यावर महापालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. पण इथे खुद्द महापालिकेच्याच जागेत स्वच्छतेच्या नावाखाली वाळलेले गवत मोठ्या प्रमाणात जाळले असल्याने आता संबंधितांवर कोण कारवाई करणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

वर्षभरापासून सुरु होण्याची प्रतीक्षा

महापालिका आयुक्त यांनी १९ एप्रिल २०२२ रोजी शहरातील पाचही जलतरण तलाव सुरु होणार असल्याची घोषणा केली होती. परंतु पंचवटीतील स्व. श्रीकांत ठाकरे जलतरण तलावाची दुरावस्था झाल्याने तो गेल्या वर्षभरापासून बंद होता. तो या वर्षी देखील सुरु झालेला नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रशासन काळात देखील दुर्लक्ष

गेल्या वर्षभरापासून महापालिकेत प्रशासकीय राजवटीत कामकाज सुरु आहे. नागरिकांनी निवेदन देऊन देखील जलतरण तलाव सुरु होण्याची वर्षभर प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये महापालिकेच्या प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ठेकेदाराच्या लेखी नगरपालिकाच; नावातील ‘महा’ गहाळ

जलतरण तलावाच्या प्रवेश द्वारावर अ‍ॅक्रेलिक मटेरियलमध्ये मोठ्या अक्षरात नाशिक महानगरपालिका नाव टाकण्यात आलेले आहे. या महानगर नावांमधील महा अक्षर गेल्या अनेक वर्षांपासून पडून गेलेले आहे. आता देखील दुरुस्तीचे काम सुरु असताना ठेकेदार किंवा महापालिका अधिकार्‍यांच्या निदर्शनास ही बाब आली नसावी हे नवलच.

First Published on: May 31, 2023 12:35 PM
Exit mobile version