खासगीकरणाविरोधात रेल्वे कामगार रस्त्यावर

खासगीकरणाविरोधात रेल्वे कामगार रस्त्यावर

खासगीकरणाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेले रेल्वे कामगार

केंद्र सरकार रेल्वे खासगीकरणाचा घाट घालत असल्याचा आरोप करत रेल्वे कामगार संघटना रस्त्यावर उतरल्या असून शुक्रवारी (१९ जुलै) मनमाडला रेल्वे वर्कशॉपमधील कामगारांनी कारखाना प्रबंधक कार्यलयावर मोर्चा काढून निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकार, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कारखाना प्रबंधक मधुसिंग यांना निवेदन देण्यात आले. बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

रेल्वेत एकूण सात मोठे व म्हत्वाचे कारखाने असून यापैकी एक मनमाड शहरात आहे. या कारखान्यात रेल्वे ब्रिज तयार करण्यासाठी लागणारे गर्डर, नट-बोल्टसह इतर साहित्य बनवले जाते. शेकडो कामगार काम करतात. केंद्र सरकारने अनेक सरकारी कंपन्याचे खासगीकरण केल्यानंतर आता रेल्वेच्या कारखान्यासह इतर विभागाचे खासगीकरण करत असल्याच्या वृत्ताने कामगारामध्ये संतापाची लाट उसळली.

शुक्रवारी सकाळी रेल्वे कामगार संघटनांच्या कार्यालयापासून कामगारांनी मोर्चा काढला. घोषणा देत हा मोर्चा कारखाना प्रबंधक कार्यालयाजवळ आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी नितीन पवार, प्रवीण बागुल, संजय दीक्षित, सतीश केदारे आदीची भाषणे झाली. रेल्वे कारखाना आणि इतर विभागाचे खासगीकरण केल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा त्यांनी दिला. यावेळी कारखाना प्रबंधक मधू सिंग यांना निवेदन देण्यात आले.

एससीएसटी कामगार असोिएशनचे सतीश केदारे, प्रवीण आहिरे, सिद्धार्थ जोगदळ, किरण आहिरे, संदीप पगारे, नॅशनल रेल्वे मजदूर संघाचे प्रवीण बागुल, रमेश केदारे, किरण कातकाडे, विलास मुलमुले, अक्रम शेख, सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे प्रकाश बोडखे, नितीन पवार, मुख्तार शेख, ओबीसी रेल्वे कामगार संघटनेचे संजय दीक्षित, भाऊलाल दरगुडे यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले.

First Published on: July 20, 2019 7:28 AM
Exit mobile version