खड्ड्यांविरोधात नगरसेवकाचे ऑनलाईन महासभेत लाईव्ह आंदोलन

खड्ड्यांविरोधात नगरसेवकाचे ऑनलाईन महासभेत लाईव्ह आंदोलन

नाशिक महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या ऑनलाईन महासभेत नगरसेवक संतोष गायकवाड यांनी प्रभागातील खडडयांविरोधात लाईव्ह आंदोलन केले. यावेळी ऑनलाईन महासभेत प्रभागातील सर्व खड्डे नगरसेवक आणि प्रशासनाला दाखवून गायकवाड यांनी अभिनव आंदोलन केले.

नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याचे आश्वासन देणार्‍या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या आश्वासनांचा विसर पडला का ? असा सवाल उपस्थित करत हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लावल्यास जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.

यावेळी नगरसेवक गायकवाड यांनी सांगितले, गेल्या तीन वर्षापासून आम्ही सातत्याने गंगापूर गाव, आनंदवली, सावरकरनगर, नरसिंहनगर, शंकरनगर, भावांजली नगर, अयोध्या कॉलनी, नवश्या गणपती परिसर आदि परिसरातील रोडची अवस्था अशी झाली आहे की खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा तेच समजत नाही सर्व नागरिक अतिशय त्रस्त झाले आहे. अनेकांना पाठीच्या मणक्यांचे आजार या खड्ड्यांमुळे लागले आहे आणि याहीपेक्षा बिकट अवस्था पाटील नेस्ट गुरुकुल कॉलनी या परिसरात झाली आहे. यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य झाले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा मायको कंपनी कार्बन अशा अनेक नामांकित कंपनीचा मार्ग या भागातून जातो. त्या भागातील रस्त्यांची अशी दयनीय अवस्था झाली आहे. पाच वर्षात नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याचे आश्वासन देणार्‍या तत्कालीन मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे दत्तक नाशिककडे दुर्लक्ष झाले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही कामे मार्गी न लावल्यास जनआंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख विलास आहेर, उपविभाग प्रमुख कैलास जाधव, राहुल निकम, विजय विधाते,शिवा उगले, अमित सावंत, अमोल परदेशी ,योगेश जाधव, बापू भोई, उपस्थित होते.

First Published on: September 15, 2020 4:04 PM
Exit mobile version