सर्व दुकाने उघडण्यास परवानगी

सर्व दुकाने उघडण्यास परवानगी

नाशिक शहरासह जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील सर्व दैनंदिन व्यवहार, दुकाने, आस्थापना सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे महिनाभरापासून बंद असलेल्या बाजारपेठा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, निर्बंध शिथील करत असताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणेही आवश्यक असेल. या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास पुन्हा पूर्वीप्रमाणे निर्बंध लागू करण्यात येतील, रेड झोनमध्ये सकाळी १० ते दुपारी ४, ऑरेंज झोनमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी राहणार आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले.

मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिक जिल्हादेखील रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला. मात्र, रेड आणि ऑरेंज झोनमध्ये सरकारच्या निर्देशानुसार काही निर्बंध शिथील करण्यात आले. त्यानुसार रेडझोनमध्ये मद्यविक्रीसह अन्य काही व्यावसायिक आस्थापना खुल्या होण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्ह्यातील नाशिकसह नऊ तालुके ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील बाजारपेठा काही अटी आणि शर्तींच्या आधारे खुल्या झाल्या असून तब्बल दोन महिन्यांनी या बाजारपेठांनी मोकळा श्वास घेतला. बाधित रुग्ण आढळलेले नाशिकसह मालेगाव शहर आणि पाच तालुक्यांमध्ये मात्र रेड झोनमध्ये एकल पद्धतीनेच म्हणजेच एका लेनमध्ये वेगवेगळया वस्तू विक्रीची पाच दुकाने असतील तर ती सुरू राहतील. परंतु, पाचहून अधिक दुकाने असतील तर त्यापैकी केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकानेच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. परंतु, शहरातील महात्मा गांधी रोड, मेनरोड यांसारख्या बाजारपेठांमध्ये मात्र पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम ठेवून केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली. शासनाच्या या निर्देशांमुळे व्यावसायिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. सोमवारी लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता मिळाल्याने नाशिकमधील वेगवेगळ्या भागातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. महिनाभरापासून दुकाने बंद असल्याने दुकाने सुरू करण्यासाठी दुकानदार अगतिक झाले होते. मात्र, कोणती दुकाने सुरू ठेवावीत याबाबत संभ्रम दिसून आला. मात्र, मंगळवारी शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार बुधवारपासून जिल्ह्यातील सर्व दैनंदिन व्यवहार, दुकाने, आस्थापने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमधे मात्र निर्बंध कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले.

दुकानदार, ग्राहकांसाठी हे असतील नियम

नियमांचे पालन न केेल्यास पुन्हा निर्बंध लादणार 

अर्थव्यवस्था व आजार यात समतोल साधता यावा याकरिता सर्व दैनंदिन व्यवहार सुरू करण्यात येत आहेत. मात्र, ही अधिसूचना जिल्ह्यातील ७५ प्रतिबंधित क्षेत्रांसाठी लागू राहणार नाही. दुकाने सुरू होणार असली, तरी सुरक्षित वावर, गर्दी टाळणे व मास्क वापर अनिवार्य असणार आहे. या नियमांचे पालन न केेल्यास पुन्हा निर्बंध लादले जातील.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

नाशिक शहरात करोनाचा पहिला बळी

शहरात करोनाचा पहिला बळी गेल्याची बाब मंगळवारी उघडकीस आली. तीन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेचा करोना अहवाल मंगळवारी सकाळी प्रशासनास प्राप्त झाला. जिल्ह्यातील मृतांची संख्या आता 13 झाली आहे. बजरंंगवाडी येथील या मृत महिलेचे वय अवघे २० असून ती ९ महिन्यांची गर्भवती होती. शनिवारी (दि. २) सायंकाळी ५.३० वाजता तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिच्यात करोनाची लक्षणे आढळल्याने स्वॅब टेस्ट घेण्यात आली. मात्र, दाखल झाल्यानंतर दोन तासांतच तिचा मृत्यू झाला. तिला हदयविकाराचाही त्रास होता, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले.

सटाणा, सिन्नर, येवल्यात पॉझिटिव्ह रुग्ण

जिल्हा प्रशासनास मंगळवारी सकाळी ८० संशयित रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात जिल्ह्यात नव्याने चार रुग्णांची भर पडल्याचे निदर्शनास आले. याशिवाय सटाणा, सिन्नर तालुक्यातील वडगाव आणि येवल्यातही प्रत्येकी एक रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले आहे.

First Published on: May 5, 2020 5:47 PM
Exit mobile version