‘अमृता पवारांचा आरोप सवंग प्रसिध्दीसाठीच’ भुजबळांवरील टिकेला राष्ट्रवादीचे प्रतिउत्तर

‘अमृता पवारांचा आरोप सवंग प्रसिध्दीसाठीच’ भुजबळांवरील टिकेला राष्ट्रवादीचे प्रतिउत्तर

नाशिक : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अमृता पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करतांना माजी पालकमंत्री तसेच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाकडून आपली कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यामुळेच आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचेही त्या म्हणाल्या. पवार यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पत्रक प्रसिध्द करण्यात आले असून, पवारांचा आरोप हा सवंग प्रसिध्दीसाठी असून त्यांनी पक्षात राहून पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माजी सरचिटणीस निलीमा पवार, राष्ट्रवादीचे दिवंगत माजी खासदार डॉ. वसंत पवार यांच्या कन्या अमृता पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. खासदार पवार यांचे शरद पवार आणि बारामतीशी कौटूंबिक नाते राहिले आहे.त्यामुळे अमृता पवार यांनी भाजपा प्रवेश करत सर्वांनाच धक्का बसला आहे. परंतू पवार यांनी प्रवेश करतांना स्थानिक नेतृत्व म्हणजेच माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शक्य तेथे अडवणूक केल्याचा आरोप केला. तसेच आपल्याला विकास कामांसाठी निधी मिळू दिला नसल्याचेही त्या म्हणाल्या. त्यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने एक पत्रक प्रसिध्द केले असून यात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करतांना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले असून त्यांनी पक्ष प्रवेश करतांना केलेले सर्व आरोप तथ्यहीन आहे.

मुळात त्या जिल्हा परिषद सदस्या म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर निवडून आल्या असतांना त्यांनी नेहमीच पक्षविरोधी भूमिका घेतली. तसेच भाजपच्या अनेक कार्यक्रमात तसेच भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या थेट सहभागी झाल्या होत्या त्यामुळे त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठतेबाबत शिकवू नये अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे. काँग्रेस मधून बाहेर पडत पवार साहेबांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली. त्यावेळी त्यांच्यावर विश्वास ठेऊन अनेकांनी त्यांना साथ दिली. त्यामध्ये सर्व प्रथम राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे होते. त्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर असतांना देखील त्यांनी ती संधी धुडकावून शरद पवारांना खंबीर साथ दिली. संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस घराघरात पोचविण्यासाठी भुजबळ रात्रंदिवस फिरले.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, अमृता पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर देवगाव गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. मात्र त्यांनी या संपूर्ण कार्यकाळात पक्षाच्या विरोधी भूमिका घेतली. त्या कायमच भाजपच्या संपर्कात राहिल्या. केवळ सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी मनात द्वेष ठेऊन त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे तथ्यहीन आहे. तसेच त्यांच्या जाण्याने पक्षाला कुठलाही फरक पडणार अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा योगिता आहेर, युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केली आहे.

First Published on: March 15, 2023 4:34 PM
Exit mobile version