शिवभोजन थाळीच्या संख्येत ५० हजारांची वाढ

शिवभोजन थाळीच्या संख्येत ५० हजारांची वाढ

करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला आहे. सध्या राज्यात एक लाख थाळींचे वितरण करण्यात येत असून लॉकडाऊनमुळे यामध्ये वाढ करत शिवभोजन थाळीची संख्या दीड लाख करण्याचा निर्णय राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत भुकेलेल्या आणि गरजु नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लॉकडाउनमुळे बेघर, गोरगरीब, स्थलांतरीत नागरिकांची उपासमार होउ नये याकरीता २८ मार्चपासून शिवभोजन थाळीचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला. शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली तसेच केंद्राची वेळ वाढवण्यात येउन ती ११ ते ३ करण्यात आली. तसेच केवळ पाच रूपयांत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने यापूर्वीच १६० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. या योजनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र अनेक जिल्हयांनी थाळयांची संख्या वाढवून देण्याची मागणी केली. ही बाब विचारात घेउन आता ५० हजार थाळयांची वाढ करण्यात आली असल्याची माहीती राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन थाळीचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला आहे. यात ५० हजारांनी वाढ करण्यात येउन आता दररोज दिड लाख थाळयांचे वितरण केले जाईल. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असून सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल.

छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

First Published on: April 23, 2020 6:32 PM
Exit mobile version