अंगणवाडी सेविकांना मिळणार दिवाळी बोनस

अंगणवाडी सेविकांना मिळणार दिवाळी बोनस

नाशिक :  गावातील बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी घेणार्‍या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना दिवाळी भेट म्हणून दोन हजार रुपये भाऊबीज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागातंर्गत जिल्ह्यातील 4 हजार 580 अंगमवाडी सेविका, 487 मिनी अंगणवाडी सेविका, चार हजार सहा अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत. त्यांना याचा लाभ मिळणार आहे. शून्य ते सहा वयोगटातील बालकांचे पोषण, स्तनदा माता, गरोदर महिलांना घरपोचपोषण आहार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असतो.

 कोविडमुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानात महत्त्वाची जबाबदारी सेबिकांनी बजावलेली आहे. दिवाळीला भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा शासनाचा निर्णय आनंद देणारा आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस या मानधनावर काम करतात, मानधन अत्यंत कमी असून त्यात उदरनिर्वाह करणे आजच्या महागाईत परवडणारे नाही. त्यामुळे शासनाने किमान मानधनाइतकी रक्कम भाऊबीज भेट म्हणून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटनाच्या वतीने केली होती.

 त्यासाठी आंदोलने देखील झाली होती. या आंदोलनाची दखल घेत, भाऊबीज देण्याचा निर्णय झाला आहे. सदर अनुदान देखील एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तांकडून वितरीत झाले आहे. याचा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना लाभ मिळणार आहे. कोरोनाकाळात त्यांनी केलेल्या कामाची ही पावती समजली जात आहे.

बोनस दिवाळीपूर्वी द्या
अंगणवाडी सेविकांना साडेआठ हजार, तर मदतनीसांना सव्वाचार हजार रुपये मानधन मिळते. दिवाळीनिमित्त त्यांना देण्यात येणारी भाऊबीज भेट ही अत्यंत तुटपुंजी आहे, शिवाय त्यास भाऊबीज भेट असे न म्हणता, बोनस म्हणावे व किमान मानधनाएवढी रक्कम बोनस म्हणून द्यावी, अशी मागणी आहे. शासनाकडून देण्यात येणारी भेटही दिवाळीनंतर मिळते, असा अनुभव आहे. यंदा तरी ही रक्कम दिवाळीपूर्वी द्यावी.
-राजू देसले
(अध्यक्ष, आशा गट प्रवर्तक संघटना)

First Published on: October 12, 2022 1:47 PM
Exit mobile version