चिकन विक्रीचा वाद अन् पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग, त्यानंतर जे घडलं ते थरारक

चिकन विक्रीचा वाद अन् पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग, त्यानंतर जे घडलं ते थरारक

नाशिक चिकन विक्रीच्या वादातून व पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून दुकानदाराने शेजारील चिकन विक्रेत्या भावांवर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सारडा सर्कल परिसरात सोमवारी (दि. २६)घडली. हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. घटनेच्या आधी जखमी दुकानदारांनी भद्रकाली पोलीसांकडे संशयितांची तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्याने हा जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप जखमींच्या नातलगांनी केला आहे. समीर आणि मझहर खान (रा. चौक मंडई, भद्रकाली) अशी गंभीर जखमी झालेल्या दोघा भावांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, सारडा सर्कलवरील वडाळा नाक्यावर समीर आणि मझहर यांचे रझा चिकन सेंटर आहे. याच दुकानाच्या बाजूला संशयित इम्रान हरुण पठाण, हसन पठाण आणि सुफियान हसन पठाण यांनी गूडलक चिकन सेंटर नव्याने सुरु केले आहे. रविवारी (दि.२५) संशयितांनी ग्राहकांना चिकन खरेदीसाठी आमच्या दुकानात या, असे म्हणून ग्राहक पळवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी समीर खान व मझहर खान यांनी आक्षेप घेत ‘ज्या ग्राहकाला ज्या दुकानात चिकन खरेदी करायचे आहे, तो त्या दुकानात जाईल, बोलवता कशाला असे म्हटले. यावरुन खान बंधू आणि इम्रान, हसन व सुफियानशी वाद झाला. त्यातून त्यांनी खान यांना धमकावले.याप्रकरणी खान बंधुंनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हाच राग मनात धरुन सोमवारी तिघांनी खान यांच्याशी वाद घालत चिकन सेंटरमधील धारदार कोयत्याने खान यांच्यावर हल्ला केला. त्यात दोघे भाऊ जखमी झाले. याप्रकरणातील संशयितांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी दिली.

First Published on: July 26, 2021 5:32 PM
Exit mobile version