सिन्नरनजीक अपघातात लष्करी जवान ठार

सिन्नरनजीक अपघातात लष्करी जवान ठार

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील खोपडी शिवारात मारुती स्विफ्ट, क्रुझर जीप आणि छोटा हत्ती यांच्यात बुधवारी (दि. ३ जुलै) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास झालेल्या तिहेरी अपघातात देवळाली कॅम्प येथील लष्करी जवानाचा मृत्यू झाला. व्यंकटेश रेड्डी (वय – ३२, रा. केरळ) असे मृत जवानाचे नाव आहे.

देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटरमध्ये कार्यरत असलेले लष्करी जवान रेड्डी हे सिन्नरमार्गे सहकुटुंब शिर्डीला स्विफ्ट कारने निघाले होते. दातली ओलांडल्यानंतर वडांगळी फाट्यावर खोपडी शिवारात स्विफ्ट कार आणि समोरुन येणारी क्रुझर यांच्यात जोरदार धडक झाली. क्रुझर जीपपुढे छोटा हत्ती (मिनिट्रक) सिन्नरच्या दिशेने येत असल्याने, समोरुन भरधाव येणाऱ्या स्विफ्टची धडक टाळण्यासाठी चालकाने छोटा हत्ती रस्त्याकडेला नेला. मात्र, नियंत्रण सुटल्याने छोटा हत्ती उलटून चालक जखमी झाला, तर स्विफ्ट कारचालक रेड्डी यांचा मृत्यू झाला. रेड्डी यांना आठ दिवसांपूर्वी मुलगी झाली होती. त्यांच्याकडे आलेल्या नातेवाईकांना घेऊन ते शिर्डीकडे निघाले होते. मात्र, रस्त्यातच त्यांच्यावर काळाने झडप घातली. दरम्यान, जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.

First Published on: July 3, 2019 8:49 PM
Exit mobile version