टोईंग कर्मचार्‍यांची मुजोरी, बापलेकाला मारहाण

टोईंग कर्मचार्‍यांची मुजोरी, बापलेकाला मारहाण

स्वतःची दुचाकी घेण्यासाठी गाडीवर गेलेल्या युवकाला पाय धरून टोइंग कर्मचाऱ्यांनी खाली ओढले.

पार्किंगच्या सुविधांची बोंब आणि त्यातच टोइंग ठेकेदाराकडून होणार्‍या दंडात्मक कारवाईला नाशिककर आधीच वैतागलेले असताना, टोइंग वाहनावरील कर्मचार्‍यांनी मंगळवारी, ९ एप्रिलला थेट न्यायालयाच्या आवारात घुसखोरी करत तेथील वाहने उचलण्याचा उद्योग केला. एवढ्यावर न थांबता या कर्मचार्‍यांनी गाडी उचलण्यास विरोध करणार्‍या बाप-लेकाला मारहाण केली. या घटनेमुळे वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या टोइंग कर्मचार्‍यांची मुजोरी पुढे आली.

जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक १ लगत मंगळवारी दुपारी ४ वाजता टोईंग कर्मचार्‍यांनी अरेरावी व दादागिरी करत थेट गेटमध्ये घुसखोरी करत नागरिकांची वाहने उचलण्यास सुरूवात केली. एका वाहनमालकाने गाडी उचलण्यास विरोध करताच कर्मचार्‍यांनी नंदकिशोर अनिल दोंदे व अनिल रघुनाथ दोंदे (रा. दत्तनगर, अंबड) या बापलेकांना मारहाण केली. दोंदे यांनी न्यायालयातील पार्किंग परिसरात दुचाकी पार्क केली होती. त्यावेळी टोईंग कर्मचार्‍यांनी मुजोरी करत येथील वाहने उचलण्यास सुरूवात केली. दोंदे यांनी दुचाकी उचलण्यास विरोध करताच कर्मचार्‍यांनी त्यांना मारहाण केली. या प्रकरणी दोंदे बापलेकांनी सरकारवाडा पोलिसांत संबंधित कर्मचार्‍यांविरोधात तक्रार केली. एवढे घडूनही पोलीस हवालदार बाळू भिकाजी शिंदे यांनी दोंदेंविरोधात तक्रार केली. दोंदे बापलेकांनी कारवाईस विरोध करत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यांनी सरकारी काम अडथळा आणला, असे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

पार्किंगची मोठी कमतरता

वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी शहरात वाहतूक शाखेकडून टोईंग कर्मचार्‍यांमार्फत कारवाई केली जाते. नो पार्किंगमध्ये वाहन असल्यास टोईंग केले जात असून, ती वाहने सोडण्यासाठी ३०० रूपये दंड वसूल केला जातो. यातील दोनशे रूपये खासगी टोईंग कर्मचार्‍यांना दिले जातात. टोईंग कर्मचारी रस्त्याकडेला वाहने उभे दिसताच टोईंग करतात. आधीच शहरात पार्किंगची मोठी कमतरता आहे. पार्किंगची असुविधा, टोईंग कर्मचार्‍यांची अरेरावी याला नाशिककर वैतागले आहेत. टोईंग कर्मचार्‍यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जाते आहे.

First Published on: April 9, 2019 10:06 PM
Exit mobile version