वाहनचोरीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने दुचाकी सोडून चोरट्याने काढला पळ

वाहनचोरीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने दुचाकी सोडून चोरट्याने काढला पळ

नाशिक : सध्या बहुतांश ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात. त्यामुळे गुन्हेगारी कारवाया तसेच गुन्हेगार त्यात कैद होत असतात. तसेच कुठे चोरी झाली तर तीही दृश्य सीसीटीव्हीत कैद होत असतात. त्यामुळे पोलिसांना चोरापर्यंत पोहचणे सोप्पे जाते. मात्र, नाशिक जिल्ह्यातील वणी येथे एक अजबच घटना घडली आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेला दुचाकीचोरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तसेच पकडले जाण्याच्या भितीमुळे चोरट्याने दुचाकी अज्ञात स्थळी सोडून पळ काढल्याचे समोर आले आहे.

वणी कळवण रस्त्यावरील तुळजाई अ‍ॅग्रो या दुकानासमोरुन भरदिवसा भगवान भिका हडस (रा. वणी) यांची दुचाकी चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी हडस यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मिळालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपासाला सुरवात केली. दुचाकी चोरी झाली त्या घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना तुळजाई अ‍ॅग्रो दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा आढळून आला. दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता पिवळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पँट परिधान केलेला युवक दुचाकी नेताना दिसून आला.

दरम्यान, चोराचा शोध घेण्यास मदत व्हावी या उद्देशाने संशयित युवकाचा व्हिडीओ अर्थात सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी सोशलमीडियावर अपलोड केले. त्यानंतर पिंपळगाव निफाड रस्त्यावरील एका शेतकर्‍याच्या घराजवळ बेवारस अवस्थेत हडस यांची दुचाकी आढळली. दुचाकी चोरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चोरट्याने पकडले जाण्याच्या भीतीने दुचाकी सोडून पळ काढला असावा, अशी चर्चा वणीमध्ये सुरु आहे. वणी पोलिसांनी दुचाकी हडस यांच्या ताब्यात दिली. व्हिडीओ व्हायरल व्हिडीओमुळे हडस यांना दुचाकी मिळाल्याने त्यांनी वणी पोलीस व फुटेज उपलब्ध करुन देणारे दुकानदार यांचे आभार मानले.

First Published on: August 23, 2023 2:07 PM
Exit mobile version