‘सिव्हिल’च्या प्रवेशद्वारावर कर्मचारी नसल्याने नातेवाईकच रुग्णाला नेतात डॉक्टरांकडे

‘सिव्हिल’च्या प्रवेशद्वारावर कर्मचारी नसल्याने नातेवाईकच रुग्णाला नेतात डॉक्टरांकडे

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ रुग्णांना वेळेवर स्ट्रेचर का मिळत नाही, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी रुग्णालय प्रशासनास दिल्या आहेत. शिवाय, मुख्य प्रवेशव्दाराजवळ अनेकवेळा कर्मचारी नसल्याने रुग्णवाहिकेच्या चालकासह नातेवाईकांना रुग्णास डॉक्टरांपर्यंत न्यावे लागते, असे मत आरोग्यसेवकांसह वाहनचालकांनी  ‘माय महानगर’शी बोलताना व्यक्त केले.

गोरगरीबांचे रुग्णालय अशी ओळख असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराजवळ रिक्षात आणलेल्या वयोवृद्ध रुग्णाला दाखल करण्यासाठी स्ट्रेचर आणि कर्मचारीच नसल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.९) सायंकाळी घडला. यासंदर्भात दै. ‘आपलं महानगर’मध्ये सिव्हिलच्या प्रवेशव्दारावर स्ट्रेचरसाठी अर्धा तास याचना; रुग्णाचा मृत्यू या मथळ्याखाली वृत प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्ताची केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि.१०) संबंधितांकडून चौकशी व अहवाल तयार करण्याचे काम सुरू होते.

रुग्णालयाच्या प्रवेशव्दार १०८ रुग्णवाहिकेसह खासगी रुग्णवाहिकांचे चालक रुग्णास वेळेत उपचार मिळावा म्हणून घेऊन येतात. मात्र, अनेकवेळा प्रवेशव्दारावर कर्मचारी नसतो तर कधी स्ट्रेचर नसते, असा अनुभव नेहमीचा असल्याचे रुग्णवाहिकांच्या चालकांनी सांगितले. असाच अनुभव आरोग्यसेवकांनासुद्धा आला आहे. ते रुग्णाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन येतात. मात्र, प्रवेशव्दाराजवळ कर्मचारी नसल्याने त्यांना नातेवाईकांसोबत रुग्णाला डॉक्टरांपर्यंत न्यावे लागत असे, असे त्यांनी सांगितले.

‘माय महानगर’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीने जिल्हा रुग्णालयाचे वास्तव मांडले आहे. अनेक गोरगरीब रुग्ण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराजवळ येतात तेव्हा कर्मचारीच नसतात. शेवटी नातेवाईकांनाच व्हीलचेअर किंवा स्ट्रेचरवर रुग्णाला घेऊन डॉक्टरांकडे जावे लागते. : दीपक डोके, आरोग्यसेवक

First Published on: May 11, 2023 11:41 AM
Exit mobile version