आषाढी एकादशी, बकरी ईद एकाच दिवशी; सातपूरकर मुस्लिम बांधवांचा कुर्बानी न देण्याचा निर्णय

आषाढी एकादशी, बकरी ईद एकाच दिवशी; सातपूरकर मुस्लिम बांधवांचा कुर्बानी न देण्याचा निर्णय

नाशिक : यंदा आषाढी एकादशी व बकरी ईदचा सण एकाच दिवशी आल्याने आषाढीच्या निमित्ताने मांस विक्री न करण्याचा तसेच बकरी ईद असूनही ‘कुर्बानी’’ न देण्याचा कौतुकास्पद निर्णय सातपूर कॉलनी, अशोकनगर व शिवाजीनगर येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. मनसेचे नेते तथा माजी नगरसेवक सलीम शेख यांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सातपूर परिसरासाठी घेण्यात आलेला हा निर्णय संपूर्ण शहरासाठी आदर्श असा निर्णय असून त्याचे स्वागत होत आहे.

आषादी एकादशी गुरुवारी २९ जून रोजी आली आहे. त्याच दिवशी बकरी ईद आल्याने सातपूरमधील हिंदु-मुस्लिम बांधवांनी हे दोन्ही उत्सव एकत्रित साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे हिंदू बांधवांच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम बांधव आषाढी एकादशीसाठी सज्ज असणार आहेत. माजी नगरसेवक सलीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अकील शेख, जाकीर खाटीक, मोहम्मद खाटीक, हारून खाटीक, मुस्तकीम खाटीक, फिरोज मन्सूरी, शकील शेख, रफिक शेख, मजीद मुल्ला, रियाज सय्यद, ईदरीश शेख आदींसह सातपूर कॉलनी, अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर परिसरातील मांस विक्रेते उपस्थित होते.

इस्लाम धर्मामध्ये तीन दिवस कुरबानी दिली जाते. त्यामुळे हिंदू धर्मांतील सर्वात मोठ्या आषाढी एकादशीला कुर्बानी न देता इतर दिवशी बकरी ईद साजरा करण्याचा एकमुखी निर्णय मटन विक्रेत्यांनी घेतला आहे. : सलीम शेख, मा. नगरसेवक

सायखेड्यातही घेतला पुढाकार 

दरम्यान, निफाड तालुक्यातील सायखेडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पी वाय कादरी यांनी ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील प्रमुख हिंदू मुस्लिम बांधवांची बैठक घेऊन त्यांना बकरी ईदच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना दिल्या. मात्र बकरी ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने सर्व मुस्लिम बांधवांनी स्वखुशीने त्यांची बकरी ईदची कुर्बानी आषाढी एकादशीच्या दिवशी न देता एकादशीच्या दुसऱ्या दिवशी देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. तसेच त्या आषाढी एकादशीच्या दिवशी मटणाची दुकाने बंद ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. धर्माच्या नावावर हिंसा भडकावणाऱ्यांनी यातून शिकवण घेण्यासारखे आहे.

First Published on: June 24, 2023 4:39 PM
Exit mobile version