पंचवटीत युवकावर प्राणघातक हल्ला

पंचवटीत युवकावर प्राणघातक हल्ला

पंचवटी :  हिरावाडी रोडवरील त्रिमूर्तीनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात २७ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. काल रात्री साडे दहा वाजता ही घटना घडली. सचिन जोशी असे जखमी युवकाचे नाव असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यातील संशयित मारेकरी फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  त्रिमूर्तीनगर परिसरात मागच्या वर्षी  युवकांच्या दोन गटात वाद झाला होता. या वादातून साईनगर, अमृतधाम येथे राहणाऱ्या व्यंकटेश शर्मा (२२) याची हत्या झाली होती. याच वादातून सचिन जोशी याच्यावर मंगळवारी रात्री अज्ञात संशयितांनी धारदार शस्त्राने वार केले.यात तो गंभीर जखमी झाला.या घटनेचे वृत्त समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्यासह गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सदर युवकास तातडीने  रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पूर्व वैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यातील जखमी युवक सचिन जोशी हा पंचवटीतील खासगी रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरनी सांगितले . हल्ला झालेल्या सचिनवर या आधीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेने पंचवटी परिसरात गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे.यामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

First Published on: October 12, 2022 6:56 PM
Exit mobile version