पालिका मुख्यालयात मास्क न वापरणार्‍या ११ कर्मचार्‍यांना दंड

पालिका मुख्यालयात मास्क न वापरणार्‍या ११ कर्मचार्‍यांना दंड

MNC

नाशिक – मास्क न वापरणार्‍यांवर कारवाई करण्याचा धडाका प्रशासनाने सुरु केला असला, तरी ‘महापालिकेच्या दिव्याखाली अंधार’ असल्याचे चित्र मुख्यालयात बघायला मिळते. ही बाब लक्षात घेऊन मंगळवारी(दि.९) महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात मास्क परिधान न करणार्‍या ११ कर्मचारी व नागरिकांवर प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची कारवाई करण्यात आली.
शासनाने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी यांना मास्क परिधान करणे बंधनकारक केले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त कैलास जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त (शहर) सुरेश खाडे यांना याबाबत निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने खाडे यांनी महापालिका मुख्यालयाच्या इमारतीतील सर्व मजल्यांवरील विभागांमध्ये व परिसरात अचानक भेटी देऊन पाहणी केली असता शासन निर्देशानुसार विविध विभागातील तसेच मनपा मुख्यालयात कामानिमित्त आलेले नागरिक असे एकूण ११ जणांनी मास्क परिधान केले नसल्याचे आढळून आले. या सर्वांकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती खाडे यांनी दिली.

मनपातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणार्‍या नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करून कार्यालयात मास्क परिधान करावे, असे आवाहन करण्यात आले असून मास्क परिधान केले नसल्याचे आढळून आल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे सुरू राहणार असल्याचे खाडे यांनी सांगितले.
विभागीय कार्यालयांमध्येही होणार कारवाई दरम्यान महापालिकेची सर्व विभागीय कार्यालये, उपकार्यालये याठिकाणी देखील अचानक भेटी दिल्या जाणार असून मास्क परिधान न करणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
मास्कचा वापर न करणार्‍यांवर कारवाई
विभाग- केसेस- दंडाची एकूण रक्कम
नाशिकरोड : ४ : २०००
पंचवटी : ३ : १५००
सातपूर : ४ : २०००
पश्चिम : १२ : ६०००
एकूण : २३ : ११५००

First Published on: November 10, 2021 3:44 PM
Exit mobile version