प्रेयसीच्या लग्नमुहूर्तावर प्रियकराने संपवली जीवनयात्रा

प्रेयसीच्या लग्नमुहूर्तावर प्रियकराने संपवली जीवनयात्रा

प्रेयसीचे लग्न दुसर्‍या तरुणाशी होणे मान्य नसल्याने आणि कुटुंबिय तिचे लग्न मोडत नसल्याने ओरिसातील प्रियकराने नाशिकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊनमुळे मृतदेह ओरिसाला नेण्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या नातेवाईकांनी त्याचे ऑनलाईनच अंतिम दर्शन घेण्याचा निर्णय घेतल्याने नाशकातील परिचितांनी या तरुणाचा अंत्यविधी केला. प्रताप कुमार बेहरा (वय २३, सध्या रा. नरहरीनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) असे आत्महत्या करणार्‍या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रताप बेहरा हा नाशिकमध्ये प्लंबिंगचे काम करायचा. तो मूळचा ओरिसामधील डामपूर (ता. जि. पट्टामुदाई, जि. केंद्रपाडा) येथील आहे. त्याचे ओरिसामधील एका तरुणीवर जीवापाड प्रेम होते. नोकरी व कामधंदा नसल्याने बेहरा याचे कुटुंबिय तिच्याशी लग्न ठरवून देत नव्हते. तिच्याशी लग्न व्हावे, यासाठी तो कामधंद्याच्या शोधार्थ नाशिकला आला होता. नाशिकमध्ये ओरिसातील ओळखीच्या व्यक्तींसोबत प्लंबिंग काम करत त्यांच्यासोबतच राहू लागला. दरम्यान, प्रेसशीचे लग्न २३ मे रोजी होणार असल्याचे त्याला समजले. त्यामुळे तो तणावाखाली होता. तिचे लग्न मोडावे, यासाठी तो कुटुंबिय, नातेवाईक व मित्रांना सांगायचा. तिच्याशी लग्न झाले नाही तर जीवन संपवून टाकेन, असे तो वारंवार सांगत होता. मात्र, त्याच्या बोलणे कोणीही गांभीर्याने घेतले नाही.

बेहरा याने शनिवारी (दि.२२) सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब त्याच्या ओळखीच्या व्यक्तींना समजली. त्यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. मृत्यू झाल्याचे सांगण्यासाठी व मृतदेह ओरिसा घेऊन जाण्यासाठी ओळखीच्या व्यक्तीने त्याच्या भावाशी संपर्क साधला. मात्र, त्यांच्या कुटुंबियांचे उत्तर ऐकून ते भावूक झाले. त्यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून कोणीच सावरलेले नाही. लॉकडाऊन असल्याने आणि रुग्णवाहिकेसाठी हजारो रुपये देणे परवडणारे नाही. त्यामुळे ऑनलाईनच त्याचे दर्शन घेऊ, तुम्हीच त्याच्या मृतदेहावर अंत्यविधी करा, असे सांगण्यात आले. रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांच्या मदतीने बेहराच्या ओळखीच्या व्यक्तीने मृतदेहाचा अंत्यविधी केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

First Published on: May 23, 2021 11:58 PM
Exit mobile version