पोलिसांमुळे एटीएम लुटीचा फसला प्रयत्न

पोलिसांमुळे एटीएम लुटीचा फसला प्रयत्न

पोलिसांमुळे एटीएम लुटीचा फसला प्रयत्न

नोकरीच्या शोधात उत्तर प्रदेश राज्यातून शहरात गोदा काठावर वास्तव्य करणार्‍या एका परप्रांतीय तरूणाने सोमवारी (दि.१८) मध्यरात्री रविवार कारंजा येथील पंजाब नॅशनल बॅँकेच्या एटीएम केंद्रात जाऊन एटीएम यंत्र फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बीट मार्शल पोलिसांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ संशयित सनी रावत (१९) यास अटक केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे नाशिक शहरात पुन्हा एटीएम यंत्राच्या लूटीचा प्रयत्न फसला. मात्र, एटीएम सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक धर्मेश पवार करीत आहेत.


हेही वाचा – सराफ दुकाने फोडणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड


काय आहे नेमके प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रविवार कारंजा येथील एटीएम केंद्रात सनीने बॅँकेचा ग्राहक बनून प्रवेश केला. यावेळी त्याने स्वत:जवळील लोखंडी हत्याराने एटीएम यंत्रावर घाव घालण्यास सुरूवात केली. यामुळे यंत्राचा पत्रा कापला गेला. मात्र, आतमध्ये असलेल्या रोकडच्या ट्रेपर्यंत त्याला पोहचता आले नाही. दरम्यान, सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या रात्रपाळीच्या गस्तीवर असलेले बीट मार्शल भगवान गवळी आणि त्यांच्यासोबत असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानाच्या मध्यरात्री एटीएममध्ये एका युवकाच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्या. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ दुचाकी थांबवून एटीएम केंद्राजवळ जात शटर खाली ओढले. यामुळे संशयित सनी गाळ्यात अडकला. पोलिसांनी तत्काळ बिनतारी संदेश यंत्रणेवरून पोलीस ठाण्याला माहिती देत अतिरिक्त पोलिसांची मदत बोलावून घेतली. पोलिसांचा फौजफाटा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केंद्राच्या परिसरात वाहने उभी करून रस्ता रोखला. यावेळी शटर पुन्हा वर करत सनीला तत्काळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

First Published on: November 18, 2019 7:25 PM
Exit mobile version